मुंबई: विधानसभेचं दोन दिवसीय अधिवेशन काल (रविवार) संध्याकाळी संपलं. यंदाच्या विधानसभेत अनेक नवीन आणि तरुण आमदार हे दाखल झाले आहेत. या नव्या आमदारांची संख्या देखील उल्लेखनीय आहे. त्यामुळे अनेक तरुण आमदार हे एकत्र असल्याचं यावेळी दिसून आलं. सध्याच्या विधानसभेत तरुण आमदार म्हणून आदित्य ठाकरे, रोहित पवार, विश्वजीत कदम, ऋतुराज पाटील यांच्या कामगिरीवर तरुणांची विशेष नजर आहे. नुकतंच पार पडलेल्या हे सर्व तरुण आमदार हिरीरीने भाग घेत असल्याचंही दिसून आलं. त्यामुळे आता तरुण मतदारांच्या त्यांच्याकडून अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये काल एक खूपच सुखद गोष्ट घडली. ज्याबाबत स्वत: रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन माहिती दिली.
'घार फिरते आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी...' अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. पण काल याच म्हणीचा प्रत्यय दिसून आला तो रोहित पवार आणि विश्वजीत कदम यांच्या एका कृतीमुळे. खरं तर गेल्या महिनाभर राजकारणाचे काही रंग पाहायला मिळाले त्याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. त्याचवेळी सर्वच पक्षातील आमदारांची देखील धाकधूक प्रचंड वाढली होती. त्यामुळे प्रत्येक पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवलं. काही आमदारांना तर थेट राज्याबाहेर ठेवण्यात आलं होतं. अखेर सत्तास्थापनेचा पेच सुटला आणि सर्व आमदारांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण या सगळ्या धबडग्यात जवळपास सर्वच आमदारांना आपल्या कुटुंबापासून लांब राहावं लागलं होतं. याच गोष्टीची खंत आमदार रोहित पवार आणि विश्वजीत कदम यांनाही लागून राहिली होती. त्यामुळेच काल अधिवेशन संपताच एकाच गाडीने घरी परतत असताना दोघेही पहिले थेट खेळण्याच्या दुकानात शिरले. गेले अनेक दिवस आपल्या मुलांपासून लांब असलेल्या या 'बाप मंडळींनी' आपल्या मुलांसाठी भरपूर खेळणी खरेदी केली.
याबाबत स्वत: रोहित पवार यांनी ट्वीट करुन माहिती दिली. तसंच त्यांनी इतर आमदारांना देखील असं आवाहन केलं की, 'या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.' असं ते म्हणाले.
पाहा रोहित पवार नेमकं काय म्हणाले:
'गेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवादिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता. कालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची मुलांची आठवण येते.' असं रोहित पवार म्हणाले
'राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनतं आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कधी कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. आता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.' अशा शब्दात रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, राजकारणामुळे अनेक नेत्यांना आपल्या जवळच्या लोकांपासून लांब राहावं लागतं. पण अशा छोट्या-छोट्या गोष्टींमधूनच ही नेते मंडळी देखील आनंद मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.