Fuel Price: मुंबई : वाढत्या महागाईत केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील दर कमी केले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने पेट्रोलवरील ८ तर डिझेलवरी ६ रुपये अबकारी कर कमी केला आहे. त्यानंतर मुंबईत प्रति लिटर पेट्रोलची किंमत ९.१६ रुपये तर डिझेलची किंमत ७.४९ रुपयांनी कमी झाली. त्यामुळे मुंबईत प्रति लिटर पेट्रोल १११.३६ तर डिझेल ९७.२८ रुपये इतकी झाली आहे. असे असले तरी इतर राज्यांच्या तुलनेत आजही महाराष्ट्रात इंधनाच्या किंमती या जास्तच आहेत.
कर कमी केल्याने मुंबईत पेट्रोलची किंमत प्रति लिटर १११.३५ रुपये झाले आहे, परंतु हैद्राबादमध्ये प्रति लिटर पेट्रोलची किंमत १०९. ६६ आणि कोलकात्यात १०६.०४ रुपये इतकी आहे. तर डिझेलची किंमत पाहता हैद्राबादमध्ये सर्वाधिक महाग आहे. हैद्राबादमध्ये प्रति डिझेलची किंमत ९७.८२ तर मुंबईत ९७.२८ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत डिझेलची किंमत प्रति लिटर ९४.२४ रुपये इतकी आहे. केंद्राने कर कमी केल्यानंतरही इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या किंमती जास्त आहेत अशी माहिती पेट्रोल डीलर्संनी दिली आहे. अहमदाबादमध्ये पेट्रोल डिझेलची किंमत प्रति लिटर ९६.४२ आणि ९२.१७ रुपये इतकी आहे. भोपाळमध्ये १०८.६५ आणि ९३.९० तर गोव्यात ९७.६८ आणि ९०.२३ इतकी आहे.
राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरील वॅट कमी केल्याचे जाहीर केले आहे. परंतु मुळात राज्य सरकारने वॅट कमी केलाच नाही. राज्य सरकारने पेट्रोलवरील २.०८ रुपये तर डिझेलवर १.४४ रुपये कमी केल्याचे म्हटले असले तरी कराच्या ऍडवेलोरेम प्रणालीनुसार केंद्र सरकारने कमी केलेल्या करामुळे दर घटले आहेत. वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सैनिक म्हणाले की वॅटमधील केंद्रीय उत्पादन शुल्क कमी झाल्याने पेट्रोल डिझेलवरील दर कमी झाले आहेत. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत अडीच हजारचा फटका बसणार आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत इतर राज्यांत पेट्रोल डिझेलचे भाव कमी असल्याने अनेक वाहन चालक शेजारील राज्यांतून इंधन विकत घेत आहेत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे पेट्रोल डिझेलच्या डीलर्संनी म्हटले आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी करावा अशी मागणी अनेकांनी केली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.