खूप झाली चर्चा... सोनियाजी तीनच गोष्टी सांगतो, त्यानंतर शिवसेनेसाठी मिळाला होकार: शरद पवार 

मुंबई
Updated Dec 04, 2019 | 14:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sharad Pawar: राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांचं समर्थन कसं मिळवलं हे आता त्यांनी स्वत:च सांगितलं आहे. 

after telling three things to sonia gandhi she supported shiv sena sharad pawar gave big information
खूप झाली चर्चा... सोनियाजी तीनच गोष्टी सांगतो, त्यानंतर शिवसेनेसाठी मिळाला होकार: शरद पवार   |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबई: राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी ज्या काही घडामोडी घडल्या त्या अवघ्या देशाने पाहिल्या. आजवर राज्यात असं अभूतपूर्व राजकारण कधीही घडलं नव्हतं. या संपूर्ण राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रस्थानी होते. या संपूर्ण राजकीय घडामोडीत शरद पवार यांनी नेमकी काय भूमिका बजावली हे आज त्यांनी स्वत:च स्पष्ट केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने शिवसेनेने सत्ता स्थापन केली. पण काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी नेमकं कसं तयार केलं याबाबत शरद पवार यांनी सांगितलं आहे. 

'जेव्हा शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत थेट मेसेज मिळाला तेव्हा मी थेट सोनिया गांधीशी बोललो. राज्यातील काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी मला सांगितलं की, आपणच याविषयी सोनियाजींशी बोलावं. खरं तर राज्यात अशा प्रकारचं सरकार स्थापन करताना काँग्रेस नेमकी काय भूमिका घेईल याविषयी मला काळजी होती. म्हणूनच मी त्यांच्याशी बोललो.' असं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, सोनिया गांधी यांच्यासोबत बैठकीत काय झालं आणि त्यांनी शिवसेनेसोबत जाण्यासाठी त्यांना कसं तयार केलं याबाबत सविस्तरपणे सांगितलं. 

'मी राज्यातील परिस्थितीबाबत सोनिया गांधीशी सुरुवातीला चर्चा केली. पण यावेळी मी माझी भूमिका मांडत होतो आणि ते त्यांची भूमिका मांडत होत्या. पण त्यातून काहीही निष्पन्न होत नव्हतं. त्यामुळे बऱ्याच चर्चेनंतर मी त्यांना म्हटलं खूप झाली चर्चा.. आता मी तुम्हाला तीनच गोष्टी सांगतो. मग तुम्ही काय ते ठरवा.' असं म्हणत शरद पवार यांनी सोनिया गांधी यांना तीन अशा गोष्टी सांगितल्या की, ज्यानंतर सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास होकार दिला.' 

पाहा शरद पवार यांनी कोणत्या ३ गोष्टी सांगितल्या की, ज्यामुळे सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तयार झाल्या: 

  1. सर्वात आधी मी सोनिया गांधींना आठवण दिली की, जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीरपणे त्याला पाठिंबा दिला होता. त्यावेळी आणीबाणीला पाठिंबा देणारे तीनच लोक होते. ते म्हणजे विनोबा भावे, श्रीपाद डांगे आणि बाळासाहेब ठाकरे. पण एक संघटना म्हणून त्यावेळी बाळासाहेबांनी आणीबाणीला दिलेला पाठिंबा हा खूप मोठा होता.'
  2. 'दुसरी गोष्ट आणीबाणीनंतर महाराष्ट्रात ज्या निवडणुका झाल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं होतं की, मी या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करणार नाही. म्हणजेच त्यांनी त्यावेळी देखील इंदिरा गांधींना पाठिंबा दिला होता. खरं तर असं कुणी करु शकत नाही. पण हे फक्त बाळासाहेबच करु शकतात.'  
  3. 'मी त्यांना तिसरी आणि शेवटची गोष्ट ही सांगितली की, सलग दोन राष्ट्रपती निवडणुकीत बाळासाहेबांनी प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना आपला पाठिंबा दिला होता. त्याच्या बोलणीसाठी मी स्वत: तेव्हा मातोश्रीवर गेलो होतो. एनडीएमध्ये असताना देखील त्यावेळी त्यांनी अशाप्रकारचा निर्णय घेतला होता. याची मी सोनिया गांधींना आठवण करुन दिली. शेवटी या गोष्टी ऐकल्यानंतर त्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आपला पाठिंबा दिला.' 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी