मुंबई : केंद्र सरकारच्या (Central Government) 'अग्निपथ' (Agneepath) योजनेला विरोध करताना उत्तरेतील राज्यांमध्ये रेल्वे गाड्यांची (trains) जाळपोळ केली जात आहे, याचा परिणाम मुंबईतील रेल्वे वाहतुकीवर होत आहे. या आंदोलनामुळे मुंबईकडे येणाऱ्या १८ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची सेवाही बाधित होणार आहे.
अग्निपथ'ला विरोध म्हणून रेल्वेगाड्या आणि स्थानकात उभ्या असलेल्या गाड्यांचे डबे पेटवून देण्याचे प्रकार सुरू आहेत. आतापर्यंत ३५ ते ४० रेल्वे डबे जाळण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत एकूण ३७० गाड्या रेल्वे रद्द करण्यात आल्या. यात २१० अतिजलद मेल-एक्स्प्रेस आणि १५९ पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले अनेक डबे हे अपघातरोधक, अर्थात एलएचबी प्रकारातील आहेत. या एका डब्यासाठी सुमारे दोन कोटी इतका खर्च येत असून, जाळपोळीमुळे आतापर्यंत सुमारे ८० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून लोकांना प्रवासाबाबत आवाहन केले आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांत उन्हाळी सुट्टीत गेलेले नागरिक पुन्हा मुंबईत येऊ लागले आहेत. उत्तरेकडून मुंबईला येणाऱ्या गाड्यांना मोठी मागणी आहे. गाड्या रद्द झाल्याने मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, पुणे येथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत, तर काहींच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेच्या अधिकृत समाज माध्यमातून याबाबतची अद्यावत माहिती देण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित गाड्यांची वेळ तपासून घराबाहेर पडावे.
रेल्वेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या माहितीच्या आधारे केंद्र सरकारने देशभरातील रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी आरपीएफ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर जास्तीत जास्त संख्येने आरपीएफ कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे, आवश्यकता भासल्यास रेल्वे पोलिसांशी समन्वय साधावा, गर्दीच्या; तसेच संवेदनशील रेल्वे स्थानकांवर चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.