ठाणे : केंद्र सरकारने (Central Government) सुरू केलेली अग्निपथ (Agneepath) योजना वादाच्या भोवऱ्यात असून अग्निवीरांवरुन सरकारवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. सामान्य जनतेसह राजकीय विरोधी पक्षांनी सरकारच्या या योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि महाविकास आघाडी सरकारचे (Mahavikas Aghadi Sarkar) गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? असा सवाल गृहनिर्माण व अल्पसंख्यांक मंत्री (Minister for Housing and Minorities ) डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना मोदी सरकारला विचारला.
डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी भाजपची मानसिकता बोलून दाखविली. ते म्हणाले,"जर मला भाजपने सर्व कार्यालयांचा सिक्युरिटी इंचार्ज केला. तर चार वर्षांनंतर जे अग्नीवीर बाहेर पडतील. त्यांना भाजपच्या कार्यालयावर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देऊ शकेन. " म्हणजे काय तर वॉचमान! या तरूणांचे नेमके काय करायचे ठरवलेय. दुसरीकडे किशन रेड्डी नावाचे केंद्रीय मंत्री म्हणतात, "या चार वर्षात त्यांना न्हाव्याचे, धोब्याचे, ड्रायव्हरचे, इलेक्ट्रिशियनचे ट्रेनिंग मिळेल". म्हणजे सैन्यात या तरूणांना न्हावी, धोबी, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन बनविण्यासाठी नेणार आहात काय? हे सर्व सहा महिन्यांचे कोर्स आहेत. भाजपच्या नेत्यांना आणि केंद्रीय मंत्र्यांना अग्निपथ आणि अग्निवीर याबद्दल काहीही माहिती नाही. हा प्रकार म्हणजे देशातील तरूणांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न आहे.
भारतीय सेना कंत्राटावर चालू शकत नाही. या भूमीवर ज्याचे मनापासून प्रेम आहे; परीक्षेच्या आधी जो तीन तीन वर्ष मेहनत करतो, तो अभ्यास करताना स्वप्न बघतो की आपणाला भारतीय सैन्यात जायचे आहे. त्याच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसतोय. सर्वात आधी १३० कोटी जनतेमधून एक प्रश्न राहिल की, सैन्य दलात जे कॉन्ट्रॅक्ट लेबर कारण आपण त्यांना सैनिक म्हणूच शकत नाही. त्या कॉन्ट्रॅक्ट लेबर्सचा कॉन्ट्रॅक्टर कोण असेल? नियमित होणाऱ्या सैन्यभरती थांबवून हे थोतांड सुरू करणे, देशाला घातक ठरेल.
हा अग्नीवीर प्रकार बहुजनांच्या आयुष्याशी खेळ आहे. सैन्यात बहुजनांचीच मुलं जात असतात ना! आपल्या गावातला सैनिक जेव्हा शहीद होतो तेव्हा पूर्ण गाव रडतं. कारण तो आपल्यासाठी गोळ्या झेलतो. अशा या देशसेवा करणाऱ्या एका वर्गाचा हा सर्वात मोठा अपमान आहे. अमित शहा यांनी अग्नीवीरांना दहा टक्के आरक्षण दिले जाईल, असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की कंत्राटावर सैन्यभरती करणे हे देशाच्या सुरक्षेशी द्रोह करणे आहे. ज्या तरूणाला अत्याधुनिक शस्रे चालविता येतात. त्याला जर उद्या नोकरी नाही मिळाली तर तो काय करेल? देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्यासाठी तरूण जेव्हा तीन वर्ष मेहनत करतात; पण, अग्नीवीरच्या निमित्ताने तारूण्याची टिंगल टवाळी चालू आहे. नोकऱ्या देऊ शकत नसाल तर देऊ नका, पण, सैन्यदलाची आणि तरूणांची चेष्टा करू नका, असेही ना. डॉ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.