Ajit Pawar: जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि इतर कर्मचार्‍यांचे पगार होणार वेळेवर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आदेश

राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

ajit pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जिल्हा परिषद आणि खासगी शाळेच्या कर्मचार्‍यांचा पगार वेळेवर होणार
  • यासाठी सर्व प्रणाली आणि यंत्रणेत सुधारणा कराव्यात.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बैठकीत आदेश दिले.

Ajit Pawar : मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांच्या तसंच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब योग्य नाही, या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झाले पाहिजे, त्यासाठी शालार्थ प्रणालीसह इतर यंत्रणांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (ajit pawar meeting over teacher and non teaching staff salary issue)

राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार अभिजीत वंजारी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रुटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणातील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी २ मे पासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी लागू होणार आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सोमवार दि. १३ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुसार याबाबतचे परिपत्रक शासनाने जारी केले आहे.

या निर्णयानुसार सोमवार दि. ०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करण्यात येणार आहे. सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राह्य धरण्यात येऊन सन २०२२-२३ मध्ये पुढील शैक्षणिक वर्षात दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी