माझ्यामुळे अजितने दिला भाजपला पाठिंबा - शरद पवार 

मुंबई
Updated Dec 02, 2019 | 21:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

राज्याच्या राजकारणात भूकंप घडवत एका रात्रीत भाजपला पाठिंबा जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट

ajit pawar support bjp because of sharad pawar vidhansabha election 2019
माझ्यामुळे अजितने दिला भाजपला पाठिंबा - शरद पवार   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई :  राज्याच्या राजकारणात भूकंप घडवत एका रात्रीत भाजपला पाठिंबा जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे मला राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. 

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार बोलत होते.  महाराष्ट्र विकास आघाडीसंदर्भात मुंबईतील नेहरू सेंटरला झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस आणि माझ्यामध्ये काही कारणावरून टोकाचे वाद झाले. हे वाद सत्ता स्थापनेविषयी नव्हते. त्यामुळे मी त्या ठिकाणाहून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितले की, तुम्ही घरी जा आम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करतो आणि हा प्रश्न सोडवतो. त्यानंतर मी त्या ठिकाणाहून निघून गेल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

मी नेहरू सेंटरमधून बाहेर पडल्यावर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि इतर सहकारी उपस्थित होते. त्यावेळी काँग्रेसशी वाद झाल्यामुळे अजित पवार यांना संताप आला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, सत्ता स्थापनेपूर्वीच काँग्रेस यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद होत असतील तर सरकार स्थापन झाल्यावर काय होईल. त्यामुळे, माझ्याशी झालेल्या वादामुळे त्यांनी तडकाफडकी भाजपशी संपर्क साधला असावा, असे शरद पवार यांनी सांगितले. 

अजित पवार यांच्याशी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधला होता. त्यांना आमच्यासोबत चर्चा करायची होती. त्यामुळे आम्ही दिल्लीत गेलो होतो, त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. या संदर्भात अजित पवार मला सांगणार होते. पण आपल्याला त्या मार्गाने जायचे नाही म्हणून मी काही त्यावर चर्चा केली नाही. पण संताप आलेल्या अजित पवार यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्याच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी