मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्व आमदारांना २४ तासांत पुन्हा परतण्याचे आवाहन केलं आहे. इतकेच नाही तर आमदारांची इच्छा असेल तर महाविकास आघाडीतून (Maha Vikas Aghadi) बाहेर पडण्याबाबतही म्हटलं आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. याच विधानावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार, नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. राज्यात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यावर चर्चा झाली. उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सरकार टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा चर्चा झाली आहे. या व्यतिरिक्त आमची कुठलीही भूमिका नाहीये.
शिवसेनेत जे काही सुरू आहे त्याबाबत शिवसेनेचे प्रवक्ते सांगतील. काही आमदार परत आले आहेत. त्यामध्ये नितीन देशमुख आहेत आणि त्यांनी काय घडलं ते सांगितलं आहे. इतर आमदारांना परतण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. आम्ही या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. हे आघाडी सरकार टिकवून ठेवण्याची आमची भूमिका आहे.
नाना पटोले यांनी निधी वाटपावरुन अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले, आमच्यातील काही मित्र पक्ष वेगळं विधान करत आहेत. मला राज्यातील जनतेला सांगायचं आहे. सरकार अस्तित्वात आल्यावर ३६ पालकमंत्री नेमण्यात आले त्यापैकी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक तृतियांश पालकमंत्री नेमण्यात आले. या सर्व जिल्ह्यांना योग्य पद्धतीने निधी वाटप करण्यात आलं. मी कधीही दुजाभाव केला नाही. विकास कामात मदत करण्याची माझी नेहमीच भूमिका असते. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम कायम असतं. चॅनलला प्रतिक्रिया देण्यापूर्वी मविआच्या नेत्यांसोबत चर्चा केली असती तर गैरसमज दूर झाले असते.
संजय राऊत यांचं वक्तव्य मी सुद्धा ऐकलं आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्रृत्वात आम्ही सरकारमध्ये गेलो आहोत. तीन पक्षांची आघाडी आहे. आमच्या तिन्ही पक्षांची जबाबदारी आहे की सरकार टिकावं. संजय राऊत यांनी हे वक्तव्य का केलं? हे त्यांनाच माहिती. त्यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी त्यावर टीका करण्याची आम्हाला काहीही कारण नाही. आम्ही सर्वांनी समंजसपणे भूमिका घेऊन या परिस्थितीतून बाहेर पडू अशा प्रकारचा प्रयत्न झाला पाहिजे असं माझं मत आहे असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार पुढे म्हणाले, पाच वर्षांसाठी महाविकास आघाडी सरकार चाललं पाहिजे. संजय राऊत यांनी तर त्यापुढे जाऊन म्हटलं होतं की, पाच नाही तर २५ वर्षे महाविकास आघाडीचं सरकार राहिलं पाहिजे. संजय राऊत यांनी केलेल्या या विधानाबाबत मी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधून विचारणार आहे की तुमच्या मनात इतर काही आहे का? मला वाटतं त्यांच्या मनात तसं काही नसावं. आमदारांना पुन्हा बोलवण्यासाठी त्यांनी तसं विधान केलं असावं.
आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहणार असंही अजित पवार म्हणाले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.