मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवत भाजप-शिवसेनेला काहीसं बॅकफूटवर ढकललं आहे. २०१४ च्या तुलनेत यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे जवजवळ १२ आमदार अधिक निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस आता विधानसभेत काम करणार आहे. याचनिमित्त आज (बुधवार) राष्ट्रवादी काँग्रेसने विधीमंडळ नेता ठरविण्यासाठी मुंबईत नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावली होती. याच बैठकीत विधीमंडळ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीकडून विधीमंडळ नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस हा विधानसभेत सध्या सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष नेतेपद देखील त्यांच्याकडेच असणार आहे. यामुळे आता विधीमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आलेले अजित पवार हेच विरोधी पक्ष नेतेपद भूषवणार की शरद पवार दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे ही जबाबदारी सोपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..
पाहा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार निवडीनंतर नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांच्या नावाची विधीमंडळ नेता म्हणून घोषणा केली. त्यांनी केलेल्या घोषणेला नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरही बड्या नेत्यांनी अनुमोदन दिलं. त्यामुळे या बैठकीत अजित पवार यांच्या नावावर एकमुखाने शिक्कामोर्तब झालं.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता. मात्र, पण अखेर अजित पवार यांच्या नावावरच शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळे आता विधीमंडळाचा गटनेता म्हणून अजित पवार यांचा आवाज सभागृहात घुमणार आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत काँग्रेसपेक्षा एक जागा कमी मिळाल्याने त्यांना विरोधी पक्ष नेते पदही मिळालं नव्हतं. पण विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपद मिळालं होतं. पण यंदा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत गेल्या वेळेपेक्षा १२ जागा जास्त निवडून आणल्या. त्यामुळे आता साहजिकच विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेताच विरोधी पक्ष नेते पदी असणार आहे.