अजित पवारांची एक घोषणा आणि पेट्रोल-डिझेल महागलं!

मुंबई
रोहित गोळे
Updated Mar 06, 2020 | 15:09 IST

राज्याच्या अर्थसंकल्पात महसूलात वाढ व्हावी यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेल याच्यावर १ रुपया अधिभार आणखी वाढवला आहे.

ajit pawar's announcement and petrol diesel costlier maharashtra budget 2020 
अजित पवारांची एक घोषणा आणि पेट्रोल-डिझेल महागलं!   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफी, मुद्रांक शुल्कात कपात यासारखे महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, याचवेळी अजित पवार यांनी एक घोषणा करताच पेट्रोल आणि डिझेल महागलं आहे. 

राज्यात सतत होणाऱ्या पर्यावरण बदलामुळे शेतकऱ्यांना अनेकदा नुकसान सोसावं लागतं. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारला मदत द्यावी लागते. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत पुरेशी नसल्याने महसूलात वाढ झाली पाहिजे यासाठी राज्याने पेट्रोल आणि डिझेलवरील अधिभार वाढविण्यात आला आहे. 

अजित पवार यांनी स्पष्ट केलं की, पेट्रोल आणि डिझेल यावर सध्या लागू असलेल्या करांव्यतिरिक्त १ रुपये प्रति लीटर अधिभार लावण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीत १८ हजार कोटींची भर पडणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र, या करवाढीचा थेट फटका हा सामन्यांना बसणार आहे. यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. 

दुसरीकडे विरोधकांनी देखील यावरुनच सरकारवर टीका केला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला तर पाने पुसलीच आहेत. मात्र, याचवेळी त्यांनी सर्वसामान्यांचा देखील खिसा कापला आहे. कारण पेट्रोल-डिझेलवर त्यांनी तब्बल १ रुपया अतिरिक्त कर लावला आहे. यामुळे राज्यात महागाई आणखी वाढणार आहे. असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.  

राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाचे मुद्दे:

  1. २ लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा,  जास्तीच्या कर्जातून २ लाख रक्कम सरकार देणार. त्यामुळे आता नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार 
  2. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपये सरकार देणार 
  3. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी  पीकविमा योजनेसाठी २ हजार ३४ कोटींचा निधी उपलब्ध करून देणार
  4. अतिवृष्टी, अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत 
  5. शेतसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी सरकार दरवर्षी १ लाख याप्रमाणे ५ लाख सौर पंप बसविण्यात येणार 
  6. राज्याच्या महसूलात वाढ होण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील इतर कराव्यतिरिक्त आणखी १ रुपये प्रति लीटर कर वाढविण्यात आला
  7. बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुंबई एमएमआरडीए रिजन आणि पुणे, पिंपरी-चिंचवड येथील घराच्या नोंदणीसाठी घेण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कामध्ये (स्टॅम्प ड्यूटी) १ टक्का सवलत देणार
  8. राज्यातील रस्ते विकासासाठी १२०० कोटी देण्याचं केंद्र सरकारकरुन आश्वासन 
  9. पुणे मेट्रोला ५ वर्षात दिला नाही तेवढा निधी या वर्षात दिला जाणार असल्याचा अर्थमंत्र्यांचा दावा  
  10. आमदारांच्या विकास निधीत तब्बल १ कोटींची वाढ, यापुढे आमदारांना दरवर्षी २ कोटऐवजी ३ कोटी विकास निधी मिळणार 

पाहा अजित पवार यांनी मांडलेला अर्थसंकल्प:

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी