फडणवीस मंत्रिमंडळापेक्षा ठाकरे मंत्रिमंडळ आहे कोट्यधीश, पहा कोण आहे सर्वात श्रीमंत मंत्री

मुंबई
Updated Jan 14, 2020 | 14:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

महाराष्ट्राचे ठाकरे मंत्रिमंडळ हे आधीच्या फडणवीस मंत्रिमंडळापेक्षा अधिक पटीने कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने सादर केलेल्या अहवालात राज्याच्या मंत्रिमंडळाविषयीची माहिती देण्यात आली

All ministers are billionaires in Thackeray cabinet
फडणवीस मंत्रिमंडळापेक्षा ठाकरे मंत्रिमंडळ आहे कोट्यधीश, पहा कोण आहे सर्वात श्रीमंत मंत्री  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील ४२ मंत्र्यांपैकी ४१ मंत्री हे कोट्यधीश असून त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २१ कोटी ९० लाख रूपये एवढे आहे.
  • देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळापेक्षा ठाकरे सरकारमधील ८२ टक्के अधिक मंत्री कोट्यधीश आहेत.
  • कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरले असून त्यांच्याकडे २१६ कोटी रूपयांची मालमत्ता आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे ठाकरे मंत्रिमंडळ हे आधीच्या फडणवीस मंत्रिमंडळापेक्षा अधिक पटीने कोट्यधीश असल्याची माहिती समोर आली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने सादर केलेल्या अहवालात राज्याच्या मंत्रिमंडळाविषयीची माहिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांपैकी विश्वजीत कदम हे सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक कर्ज डोक्यावर असलेले मंत्री आहेत. शिवाय ठाकरे मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच मंत्री कोट्यधीश आहेत.

असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉर्म या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीतून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल या अहवालात कोणतीच माहिती दिलेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील ४२ मंत्र्यांपैकी ४१ मंत्री हे कोट्यधीश असून त्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २१ कोटी ९० लाख रूपये एवढे आहे. या संस्थेच्या पाहणीतून ही आकडेवारी समोर आली आहे. तसेच त्याबाबतचा अहवालही संस्थेने नुकताच प्रसिद्ध केला आहे.

निवडणूक अर्जासोबत मंत्र्यांनी जोडलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. मात्र, निवडणूकच न लढवलेल्या मुख्यमंत्र्यांबाबत या अहवालात चकार शब्दही उल्लेख केलेला नाही. मंत्र्यांच्या मालमत्तेसोबतच त्यांची आर्थिक परिस्थिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतही या अहवालात माहिती देण्यात आलेली आहे. सादर केलेल्या अहवालानुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळापेक्षा ठाकरे सरकारमधील ८२ टक्के अधिक मंत्री कोट्यधीश आहेत. यापैकी विश्वजीत कदम, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री राजेश टोपे या तिघांनी आपल्याकडील सर्वाधिक मालमत्ता जाहीर केली आहे.

कॉंग्रेसचे राज्यमंत्री विश्वजीत कदम हे सर्वात श्रीमंत मंत्री ठरले असून त्यांच्याकडे २१६ कोटी रूपयांची मालमत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे ७५ कोटींची संपत्ती आहे तर राजेश टोपे यांच्याकडे ५३ कोटी इतकी मालमत्ता आहे. पहिल्यांदाच विधानसभेत बसलेल्या राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांची ३९ लाख रूपयांची मालमत्ता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वार्षिक उत्पन्न हे ३ कोटी ८६ लाख आहे, तर अमित देशमुख यांचे ३ कोटी २६ लाख आणि विश्वजीत कदम यांचे २ कोटी ३५ लाख रूपये वार्षिक उत्पन्न आहे.

विशेष म्हणजे ठाकरे मंत्रिमंडळातील केवळ १८ मंत्र्यांनी आपली शैक्षणिक पात्रता जाहीर केली आहे. आठवी ते बारावीपर्यंत या मंत्र्यांचे शिक्षण आहे. २२ मंत्री हे पदवीधर आहेत. एकूण मंत्र्यांपैकी ४० टक्के अर्थात १७ मंत्र्यांचे वय २५  ५० दरम्यान आहे. तसेच २५ मंत्री ५१ ते ६० या वयोमर्यादेतील आहेत. या मंत्रिमंडळात केवळ ३ महिला आहेत. कॉंग्रेसचे विश्वजीत कदम हे सर्त श्रीमंत मंत्री असले तरी त्यांच्यावरच कर्जाचा सर्वाधिक बोजा आहे. अहवालानुसार, ४२ मंत्र्यांपैकी ३७ मंत्र्यांनी आपल्यावरील कर्जाचा तपशील दिला आहे. त्यापैकी तीन मंत्र्यांवर मोठे कर्ज आहे. विश्वजीत कदम यांच्या १२१ कोटींचे, जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३७ कोटींचे आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर २२ कोटी रूपयांचे कर्ज आहे.

या अहवालात सर्वात चिंताजनक बाब आहे ती सध्याच्या मंत्रिमंडळातील २७ मंत्र्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे खटले दाखल आहेत. शिवाय १८ मंत्र्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी