Devendra Fadnavis: मुंबई: महाराष्ट्राचे (Maharashtra)उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Expansion) चर्चेसाठी दिल्लीला (Delhi) पोहोचले असल्याचं समजतं आहे. जिथे ते पक्षाच्या भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणार आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मात्र दिल्लीला गेलेले नाहीत. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या बैठकाच्या रद्द केल्याच्या बातम्या येत आहेत. अचानक फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या बैठका रद्द करण्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र मंत्रिमंडळ स्थापन झालेलं नाही, त्यामुळे सातत्याने बैठकांच्या फेऱ्या सुरु आहेत. (amidst news of cabinet expansion devendra fadnavis is coming to delhi but cm eknath shinde is in mumbai)
एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले नाही?
सत्ता स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा एकत्र दिल्ली दौरा केला आहे. मात्र, आज अचानक फडणवीस हे एकटेच दिल्लीसाठी रवाना झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांची प्रकृती काहीशी बिघडल्याने त्यांनी आजच्या आपल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत. त्यामुळेच ते दिल्लीला देखील जाऊ शकले नसल्याचं बोललं जात आहे.
अधिक वाचा: धनुष्यबाणाबाबत निकालापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका: कोर्ट
लवकरच मंत्रिमंडळ होणार स्थापन
शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मंत्रिमंडळात शिंदे गटातील शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजपचे आमदार मंत्री होणार आहेत. यावेळी नेमका कोणाकोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याबाबत अनेक अंदाज व्यक्त कले जात आहेत. नव्या मंत्रिमंडळात नेमके कोणकोण मंत्री असणार याबाबत सारं काही ठरलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्यापही खाते वाटपावरुन मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला असल्याचं समजतं आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. सध्या राज्य मंत्रिमंडळात शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच सदस्य आहेत. या दोघांनी 30 जून रोजी शपथ घेतली होती.
अधिक वाचा: 'या' दिवशी होणार शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार
मंत्रिमंडळाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की...
एकनाथ शिंदे यांनी आधीच सांगितले आहे की, 'ज्याचे जेवढे आमदार असतील त्याच प्रमाणात मंत्रिपदांचं वाटप होईल. खाते वाटपाबाबत देखील सहमती झाली आहे, पण काही खात्यांबाबत जो सस्पेन्स निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी फडणवीस दिल्लीत जात आहेत.' शिंदे यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारले असता ते पत्रकारांना म्हणाले की, 'आम्ही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत.'
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.