अमृता फडणवीसांची पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका! 

मुंबई
रोहित गोळे
Updated Dec 24, 2019 | 17:42 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ही टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

amruta fadnavis criticizes chief minister uddhav thackeray again 
अमृता फडणवीसांची पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका!   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • अमृता फडणवीस यांचा ट्विटरवरुन पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
  • अमृता फडणवीस यांनी शिवसैनिकांवर देखील साधला निशाणा
  • अमृता फडणवीस यांच्याकडून टीकेला प्रत्युत्तर

मुंबई: भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी ट्विटरवरुन टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी त्यांचा जोरदार विरोध केला. अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. आता याच आंदोलनानंतर अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

'तुम्ही लोकांना मारुन नेतृत्व सिद्ध करु शकत नाही लोकांवर हल्ला करणे म्हणजे नेतृत्व नाही. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे!' असं ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. 

याच ट्वीटसोबत अमृता फडणवीस यांच्या बॅनरला करण्यात येणाऱ्या जोडे मारो आंदोलनाचा व्हिडिओ देखील त्यांनी शेअर केला आहे. त्यामुळे आता राज्यातून भाजपची सत्ता गेल्यानंतर अमृता फडणवीस या शिवसेनेवर टीका करण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत. 

नेमकं प्रकरण आहे तरी काय? 

देवेंद्र फडणवीस यांनी 14 डिसेंबरला सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. माझं आडनाव गांधी आहे. सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राजकारणात मोठा गदारोळ झाला. त्यावर फडणवीसांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली होती. ट्विटवर ट्विट करत फडणवीसांनी ही टीका केली होती. त्यांचच ट्विट रिट्विट करत अमृता फडणवीसांनी आठ दिवसांनी टीका केली आहे. 

अमृता फडणवीस यांनी या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनाही टॅग केलं आहे. अमृता फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलं की, खरंय देवेंद्रजी, ठाकरे आडनाव लावल्यानं कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी खरं आणि तत्त्वनिष्ठं असावं लागतं. लोकांच्या भल्यासाठी काम करावं लागते. एखाद्यानं स्वतःचे कुटंब आणि सत्ता यांच्या कार्यपद्धतीपेक्षा लोक आणि पक्षाच्या सदस्यांच्या हितासाठी तत्वनिष्ठ विचार करण्याची गरज असते. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलीकडे जाऊन लोकांसाठी प्रामणिकपणे काम करावं लागतं. 

त्यांच्या या ट्वीटनंतर शिवसेना नेत्यांनी तात्काळ प्रत्युत्तर देणं सुरु केलं. अमृता यांनी केलेल्या या टीकेला शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. “सत्तालोभी आनंदीबाईंनी रघुनाथदादा पेशवेंची बुद्धी भ्रष्ट केली”, अशा शब्दांत अमृता यांना या नगरसेवकाने प्रत्युत्तर दिले आहे.

रघुनाथदादा पेशवे हे इतिहासात बुद्धिमान, पराक्रमी असल्याचे सुरूवातीचे उल्लेख आहेत. सत्तालोभी आनंदीबाईंनी त्यांची बुद्धी भ्रष्ट केली. त्यांनी नैतिकतेचा मुडदा पाडला आणि राघोबा खलनायक झाले. वर्तमानात इतिहास विसरायचा नसतो”, असे प्रत्युत्तर अमेय घोले यांनी ट्विटरद्वारे अमृता फडणवीस यांना दिले आहे. हे ट्विट करताना त्यांनी ‘ठाकरे ठाकरेच’ आणि ‘आजच्या आनंदीबाई’ असे हॅशटॅगही वापरले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी