Sachin Vaze :मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी कुठल्याही प्रकारची वसूली करण्यास सांगितले नव्हते अशी माहिती निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) दिली आहे. तसेच अनिल देशमुख किंवा त्यांच्या कर्मचार्यांना आपण पैसे दिलेच नाही असेही वाझेने आयोगापुढे सांगितले. सचिन वाझेने आज चांदिवाल आयोगासमोर (Chandiwal Commission) साक्ष दिली. माजी पोलीस अधिकारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. या आरोपाची चौकशी करण्यासाठी चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. (anil deshmukh never demand money says sachin vaze)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी वाझेची चौकशी केली. तुम्ही अनिल देशमुख यांना कधी पैसे दिले का असा प्रश्न कुलकर्णी यांनी वाझेला विचारला. त्यावर वाझेनी कुठल्याही प्रकारे पैसे दिले नसल्याचे स्पष्ट केले.
वाझेने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कुठल्याही कर्मचार्याला पैसे दिले नसल्याचे म्हटले आहे. देशमुख यांचे सहाय्यक कुंदन शिंदे यांना पैसे दिले का अशी विचारणा केली असता वाझेने मला आठवत नाही असे उत्तर दिले. तसेच आपण कुठल्याही बार किंवा बार मालकाकडून पैसे घेतलेच नाही असेही चौकशीत म्हटले आहे.
यापूर्वी ईडीला दिलेल्या साक्षीत वाझेने देशमुखांवर बार आणि हॉटेल मालकांकडून पैसे घेण्याचे आदेश दिले होते असा अरोप केला होता. तसेच देशमुख हाय प्रोफाईल प्रकरणातील चौकशीत निर्देश द्यायचे असेही वाझेने साक्षीत म्हटले होते. ऑक्टोबर २०२० मध्ये अनिल देशमुख यांच्या दिनेश्वरी निवसास्थानी देशमुखांनी आपल्याकडे १७५० बार आणि हॉटेल्सची यादी दिली होती, त्यांच्याकडून तीन-तीन लाख रुपये वसूल करण्याचे आपल्याला आदेश दिले होते असा आरोप वाझेने केला होता. तसेच या बार आणि हॉटेल्समधून जमा केलेले पैसे देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्याकडे सुपुर्द केले होते असेही वाझेने आपल्या साक्षीत म्हटले होते.
या प्रकरणी ईडीने अनिल देशमुख यांना अटक केली होती. सध्या देशमुख न्यायालयीन कोठडीत आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या आधाराखाली २१ एप्रिल रोजी सीबीआयने देशमुख आणि त्यांच्या सहकार्यांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. सचिन वाझे मुंबई पोलिसांत सहाय्यक निरीक्षकपदी होता. मुकेश अंबानीच्या घराजवळ एका कारमध्ये स्फोटकं आढळल्याप्रकरणी वाझेला अटक करण्यात आली होती. त्यानंतर वाझेला निलंबीत करण्यात आले होते. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपावर सीबीआय आणि ईडी दोन्ही संस्था तपास करत आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.