Aryan Drugs Case: मुंबईतील सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवण्यासाठी सर्व धंदे सुरू-संजय राऊत

मुंबई
भरत जाधव
Updated Oct 25, 2021 | 11:37 IST

क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या खुलासानंतर आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण आले आहे.

To move Mumbai's cine world out of the state -Sanjay Raut
मुंबईतील सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवण्यासाठी सर्व धंदे सुरू-संजय राऊत   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत.
  • केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे.
  • एनसीबीने आरोप फेटाळल्यानंतर संजय राऊत म्हणाले की, चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपाशी संबधित पंच आहेत.

मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणातील पंच प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांनी केलेल्या खुलासानंतर आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण आले आहे. दरम्यान साईल यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांमुळे एनसीबीच्या कारवाईवरून महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi)नेत्यांनी टीका केली आहे. राज्यातील सिनेसृ्ष्टी (Bollywood) हलवयाची आहे, त्यामुळे हे सर्व धंदे सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

“सुशातसिंह राजपूत प्रकरणापासून एक चित्र निर्माण केले आहे महाराष्ट्रात फक्त गांजा, अफू, चरस याचेंच पीक निघते. मुंबईची सिनेसृष्टी ही महाराष्ट्राचे वैभव आहे. त्याला, मराष्ट्रातल्या काही लोकांना बदनाम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यावर बोट ठेवले आहे. गुजरातच्या बंदरावर २५ हजार कोटींचे ड्रग्ज पकडले त्याची बातमी होत नाही. नवाब मलिक जे मांडत आहेत हे पाहिल्यावर स्पष्ट दिसते की काहीतरी गडबड आहे. याचे पुरावे आता समोर आले आहेत. बॉलीवूड कलाकाराकडून खंडणी मागण्यासाठी हे क्रूझ पार्टी प्रकरण केले की काय?,”  असे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

“महाराष्ट्र पोलिसांचे खाते ड्रग्जविरोधात काम करत आहे. त्यासाठी केंद्राने इथे येऊन काम करण्याची गरज नाही. केंद्रीय तपास यंत्रणांचे काम आंतरराष्ट्रीय स्तरावरील तस्करी रोखण्याचे काम आहे. छोट्या प्रमाणात ड्रग्ज पकडायचे आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये जणूकाही फार मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेत आहेत असे दाखवायचे. मुंबईतली सिनेसृष्टी राज्याच्या बाहेर हलवायची आहे यासाठी हे धंदे सुरु आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा देशाच्या असतात राजकीय पक्षाच्या नसतात. भाजपाचे लोक केंद्रीय यंत्रणा त्यांच्या नोकर आहेत अशा तऱ्हेने कारभार करत आहेत,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“याविषयी बोलताना भाजपाच्या लोकांना वाटते की ते आकाशातून पडले आहे. सगळे व्हिडीओ, पुरावे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करावी असे माझे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांनी याचा तपास करण्यासाठी एका विशेष पथकाची स्थापना करावी अशी मागणी होत आहे. पण हे केंद्रीय तपास यंत्रणांचे जे लोडणं आमच्या गळ्यात मारले आहे ते काढले पाहिजे,” असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, एनसीबीने आरोप फेटाळून लावले आहेत असे म्हटल्यावर संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. “पुरावे आहेत का समोर? चोर स्वतःला चोर असल्याचे सांगत नाही. खोटे पंच, पंचनामे, भाजपाशी संबधित पंच आहेत. त्यातील एकानेच पैशाचे व्यवहार कसे झाले याची माहिती दिली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी