मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग - आशिष शेलार

मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत.

ashish shelar allegation against supplementary demand
मंत्रालयातून इमारतींंचे भोगवटा प्रमाणपत्रे देण्याचे नवे उद्योग - आशिष शेलार  |  फोटो सौजन्य: YouTube

थोडं पण कामाचं

  • मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय
  • भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप
  • 21 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीसाठी विविध तरतुदी दिसतात मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी तरतुदी का नाही

मुंबई : मुंबई महापालिकेने नाकारल्या नंतर मंत्रालयातून नगर विकास विभागाने भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे नवे उद्योग सुरु केलेत. मुंबई महापालिकेच्या अधिकारावर का गदा आणली जातेय? असा सवाल करीत भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी बांद्रा येथील एक असे प्रकरणच आज सभागृहात उघड केले.

विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरील चर्चेला सुरुवात करताना भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी 21 हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीसाठी विविध तरतुदी दिसतात मग मुख्यमंत्र्यांच्या मुंबईसाठी तरतुदी का नाही? असा खोचक सवालही त्यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी कला नगर पुलाचे लोकार्पण करताना मुंबईचा सुनियोजित विकास झाला पाहिजे असे विधान केले. गेली पंचवीस वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असताना आताच सुनियोजित विकासाची आठवण का व्हावी? असा उपरोधिक टोला ही आमदार अँड. शेलार यांनी लगावला.

एकिकडे पर्यावरण मंत्री सांगतात की, मुंबईच्या विकासासाठी एकच प्राधिकरण असायला हवे. जर महापालिकेचे अधिकार अबाधित राहून असे प्राधिकरण होणार असेल तर आमचा विरोध नाही. पण एकिकडे असे सांगितले जात असले तरी मंत्रालयातून कृती मात्र उलटी केली जाते. पाली हिल येथील कृष्णा-अजय डेव्हलपर्सने यांच्या इमारतीचे बांधकाम करताना फनेल झोनच्या नियमापेक्षा 10 फूट जास्त उंच करण्यात आले. त्याला एअरपोर्ट अँथाँरिटीने विरोध केला त्यामुळे मुंबई महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र  नाकारले. मात्र याबाबत मंत्रालयात नगर विकास विभागाने सुनावणी घेऊन त्या विकासकाला भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आले. अशा प्रकारे महापालिकेने अनधिकृत ठरवलेल्या इमारतींंना आता बांधकाम परवाने आणि भोगवटा प्रमाणपत्रे पण मंत्रालयातून देणार का? महापालिकेच्या अधिकारावर गदा आणणार का? जी तातडी कृष्णा- अजय डेव्हलपर्सच्या कामात दाखली ती फनेल झोन मधील इमारतींच्या पुनर्विकासा बाबत का दाखवत नाही?  हाच का तो तुमचा सुनियोजित विकास? असा सवाल आमदार शेलार यांनी केला.

500 चौरस मिटर पेक्षा छोट्या भूखंडावरील इमारतींच्या पुनर्विकासाला चालना देणारे धोरण मुंबई महापालिकेने मंजूर केले. त्यातून काही सवलती देण्यात आल्या ही बाब अत्यंत चांगली आहे. पण एकदा धोरण महापालिकेच्या सुधार समितीने मंजूर केल्यानंतर पुनर्विकासाचे प्रत्येक प्रस्ताव महापालिकेच्या सुधार समितीत आणायची अट का घातली? हीतर टोल वसूली आहे. मुंबईत अशा 25 हजार इमारती आहेत म्हणजे धोरण मंजूर करताना कोणी "भेटले" नाही म्हणून प्रत्येक प्रस्ताव सुधार समितीत आणायची अट घातली का? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी केला.

वांद्रे वरळी सिलिंक मुळे बाधित होणाऱ्या वांद्रे, खार, जूहू वर्सोवा येथील कोळी बांधवांच्या नुकसान भरपाईचे काय? वांद्रे चिंबई येथे जेट्टी उभारली जात असून त्याला स्थानिक कोळी बांधवाचा विरोध आहे मग सरकार ही जेट्टी कुणासाठी बांधतेय? 

पुरवणी मागण्यांंमधे सरकारने ईव्हीएम मशिनसाठी 2.5 कोटींची तरतूद केली आहे त्यामुळे यापुढे काँग्रेस ईव्हीएम मशिन विरोधात बोलणार नाही असा टोला त्यांनी लगावला. तर समृद्धी महामार्गात जागा गेलेल्या शहापूरच्या 85 वर्षीय सावित्रीबाई कदम यांना दोन वर्षे मोबदला मिळाला नाही तो तातडीने मिळावा अशी मागणी करीत याकडे सरकारचे लक्ष वेधले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी