दिल्ली हिंसाचार : आशिष शेलारांचा शरद पवार आणि संजय राऊतांवर हल्लाबोल 

महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, महाराष्ट्रातील आमचे  विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून माथेफिरूंच समर्थन करीत आहेत.

ashish shelar ask question to Sharad pawar and sanjay raut
शेलारांचा शरद पवार आणि संजय राऊतांवर हल्लाबोल  

थोडं पण कामाचं

  • काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून माथेफिरूंचं समर्थन  
  • रोज वचवच करणारे खासदार संजय राऊत आज देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत?
  • शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट आज या पोलीस आणि जवानांच्या बाजूने का आली नाही?

मुंबई :  महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, महाराष्ट्रातील आमचे  विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून माथेफिरूंच समर्थन करीत आहेत. हिंसेचे समर्थन उघडपणे करीत आहेत. आणि म्हणून त्यांना सांगावेसे वाटते की कुठे फेडाल ही पापे? अशी घणाघाती टीका भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली. वांद्रे येथील आपल्या कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. 

काल नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर शेतकरी आंदोलक आक्रमक झाले त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली. लाल किल्ल्यावर निशाण फडकावले. याबाबत प्रतिक्रिया देताना शेलार म्हणाले, महाराष्ट्रतील आणि मुंबई पोलीसांच्या चौकशी वर प्रश्नचिन्ह निर्माण करून जर बोट ठेवले तर तो महाराष्ट्र द्रोह होतो अशी भाषा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडून केली जाते, मग दिल्लीच्या कालच्या घटनेमध्ये पोलिसांवर ट्रॅक्टर घातले गेले, पोलिसांचे ट्रॅक्टर बळी घेण्याणा प्रयत्न ज्यांनी केला, त्यांच्या विरोधात कुणी चकार शब्दही काढला नाही.

रोज वचवच करणारे खासदार संजय राऊत आज देशातील जवान आणि पोलिसांच्या बाजूने का बोलले नाहीत? अशी टीकाही शेलार यांनी केली. 

कधीकाळी आवश्यक असल्यावर फेसबुक पोस्ट टाकणारे शरद पवार साहेब तुमची फेसबुक पोस्ट आज या पोलीस आणि जवानांच्या बाजूने का आली नाही? असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला. 

म्हणूनच आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, या आंदोलनामध्ये वावर आणि वास अन्य लोकांचा चालू आहे त्याचे समर्थक  शरद पवार साहेब आणि संजय राऊत तुम्ही स्वतः आहात? आणि म्हणून तुमची तोंडे आज का शिवली आहेत? हा प्रश्न आम्ही तुम्हाला देशवासियांच्या वतीने विचारतोय. असे शेलार म्हणाले. 

2014 पासून 2020 पर्यंत केंद्र सरकारने जनहिताचे निर्णय घेतले की, कधी लॉंग मार्च तर कधी लॉंग आंदोलन, कधी पुरस्कार वापसी, कधी पुरस्कार वापसिचे समर्थन ही सातत्याने भूमिका या देशातील शहरी नक्षलवादी आणि मोदीविरोधकांनी घेतलेली आहे.

आम्ही पाहिले की, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डायरेक्टर नेमला की आंदोलन सुरू, जेएनयूमध्ये बर्सी कुणाची साजरी केली जाते, त्याला विरोध केला कि दिवस-दिवस आंदोलन... देशात नागरिकांना अभय मागणार्‍यांना  केंद्र सरकारने सीएए कायद्यातून अभय दिले त्यावर रस्ते बंद करून आंदोलन केले.  म्हणून राजकीय सूडापोटी, मोदी द्वेषापोटी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुर्दैवाने शिवसेना या देशात अराजकता माजवून पाहते आहे, देशवासीय यांना सोडणार नाहीत, असेही शेलार म्हणाले. 

कालच्या घटनेमध्ये दिल्ली पोलीस आणि जवानांनी जो परम्मोच्च संयम दाखवला तो त्यांच्या पराकोटीच्या देशभक्तीचा परिचय होता. केंद्र सरकार संयमाने या आंदोलनाला सामोरे गेले ते  केंद्र सरकारचे पराकोटीच्या देशभक्तीचा परिचय होता.. विरोधकांना काय हवे होते? गोळीबार हवा होता का? आंदोलन चिघळलेले हवे होते का? म्हणून माथी भडकवण्याचे काम पवार साहेब तुमच्याकडून अपेक्षित नाही.

या विषयात न्यायालयात केसेस आहेत, सुप्रीम कोर्टाचे आम्ही ऐकणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या समितीसमोर आम्ही जाणार नाही, सुप्रीम कोर्टाच्या समितीच्या सदस्यांवर आम्ही प्रश्न विचारू, तासन-तास दिवसेंदिवस कृषिमंत्री अत्यंत नम्रतेने चर्चा करू इच्छितात त्यांची आम्ही हेटाळणी करू, हे सगळे कशाचे द्योतक आहे? त्यामुळे संयमाची भाषा तर शिवसेना ,काँग्रेस-राष्ट्रवादीने करू नये आणि माथेफिरूंचे समर्थक म्हणून काम करू नये, असेही शेलार यांनी सांगितले. 

पोलिसांनी चौकशी करून या संपूर्ण प्रकरणातील जो दोषी असेल त्याला पकडावा आणि माथेफिरूच्या समर्थकांत पर्यंत ही पोलिसांनी पोहोचावं असे आमचे म्हणणे आहे.ज्यांचे दामन रक्ताने माखले आहेत त्यांनी दुसर्‍यावर आरोप करू नये जे सत्य आहे ते काल देशाने पाहिले.जे सत्य आहे ते चौकशी समोर येईलच, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. 

पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणं हे कुठल्या देशभक्तीत बसते?
हे पवार साहेबांनी आणि संजय राऊत यांनी स्पष्ट करावे. पोलिसांवर लाठ्या उचलल्या, जवानांना लाथाबुक्क्यांनी मारणं, तलवारी काढणं, हे कुठल्या देशभक्तीमध्ये येते? हे पवार साहेब आणि संजय राऊत यांनी सांगावे, असा सवाल शेलार यांनी केला. 

या आंदोलनाला ज्यांनी तीव्र रूप दिलं त्यांची चौकशी तर होईलच, झालीच पाहिजे त्यासोबत ज्यांनी या हिंसेचे समर्थन केले त्यांचे सुद्धा चौकशी झाली पाहिजे.

महाराष्ट्रात कायदा लागू आहे... 

महाराष्ट्र मध्ये हा कायदा लागू झाला, शेतकऱ्यांचे फायदे मिळू लागले आहेत,
2003 पासून ज्यांनी या कायद्याची वकिली केली ते आज संयमाची गोष्ट करत आहेत. 17 वर्षानंतर सुद्धा या कायद्याचा वनवास संपत नाही.17 वर्ष कायदा आणून झाली त्याची चर्चा सुरू झाली, अजून यावर चर्चा करायची आहे...याचा अर्थ चर्चेचे गुर्हाळ सुरु ठेवून हे दुतोंडी हत्यार महाराष्ट्र विकास आघाडी वापरू पाहतेय, असा आरोप शेलार यांनी केला.  

या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, त्याला कर्ज मुक्त करणार, त्याला पिक विमा उपलब्ध करून देणे, त्याला बी बियाणे योग्य देणे, त्याच्यावर सावकारी असता कामा नये, त्याच्या मंडी मध्ये त्याला मतदानाचा अधिकार देणे, त्याचा मालक मंडी सोडून बाहेर विकण्याची त्याला मुभा देणे, त्याचे उत्पन्न वाढवणं , दुप्पट करणे या सगळ्या बाबांची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. ती शेतकरी हिताची आहे, स्वामीनाथन आयोगापासून शेतकरी हिताची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे, त्या विरोधात जे प्रश्न उपस्थित करत आहेत ते दलालांची बाजू घेत असल्याचे शेलार म्हणाले. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी