Aslam Shaikh Guardian Minister of Mumbai or Malad? : मुंबई : काँग्रेस आमदार आणि राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य तसेच मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्याविषयी मुंबई महापालिकेच्या अनेक नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
अस्लम शेख मुंबई शहर जिल्ह्याचे तर आदित्य ठाकरे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण अस्लम शेख यांचा विधानसभा मतदारसंघ मालाड पश्चिम हा आहे. हा मतदारसंघ मुंबईच्या उपनगर जिल्ह्यात आहे. यामुळे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असूनही अस्लम शेख यांचे मालाडमध्ये अधूनमधून सरकारी कार्यक्रम असतात.
जोपर्यंत फक्त सरकारी कार्यक्रम होते तोपर्यंत नगरसेवकांचा विरोध नव्हता. मात्र अलिकडच्या काळात महापालिकेच्या निधीतून मालाडमध्ये सुरू असलेल्या अनेक लहान-मोठ्या कामांचे श्रेय पण अस्लम शेख स्वतःकडे घेऊ लागले आहे. मालाडमध्ये प्रत्येक लहान-मोठ्या कामाच्या ठिकाणी अस्लम शेख आणि त्यांच्या मुलाचा फोटो असलेली पोस्टर झळकत आहेत. महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचे श्रेय पण अस्लम शेख लाटत असल्याचे पाहून नगरसेवकांमध्ये नाराजी पसरण्यास सुरुवात झाली आहे.
अस्लम शेख यांच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तीन, शिवसेनेचा एक आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांचे मतदारसंघ आहेत. मालाडमध्ये महापालिकेच्या निधीतून रस्त्यांशी संबंधित कामं सुरू आहेत. तसेच पर्जन्यवाहिनी आणि जलवाहिनीचे काम सुरू आहे. पण अस्लम शेख सरसकट प्रत्येक कामाचे श्रेय घेणारी स्वतःची पोस्टर ठिकठिकाणी झळकवत आहेत.
मालाडमधील शिवसेना नगरसेविका गीता भंडारी यांच्या मतदारसंघात अस्लम शेख यांचीच जास्त पोस्टर दिसत आहेत. या प्रकाराविरोधात पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करण्याचा प्रयत्न करूनही भंडारी यांना न्याय मिळालेला नाही. आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांची मैत्री आहे. यामुळे अस्लम शेख यांच्या पोस्टरबाजीकडे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. यामुळे नगरसेवकांच्या पातळीवर अस्लम शेख यांच्या विरोधातील नाराजी आणखी तीव्र झाली आहे. नगरसेवक खासगीत अस्लम शेख मुंबई शहरचे की मालाडचे पालकमंत्री अशी चर्चा करू लागले आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.