'ते' वादग्रस्त पुस्तक अखेर घेतलं मागे, भाजपच्या 'या' बड्या मंत्र्याने दिली माहिती 

मुंबई
रोहित गोळे
Updated Jan 14, 2020 | 09:24 IST

'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' या पुस्तकावरुन सुरु झालेला वाद अंगलट येण्याची चिन्ह दिसू लागल्याने आता हे पुस्तक मागे घेण्यात आलं आहे. पुस्तक मागे घेण्याबाबतची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे

author has apologised and withdrawn his book said bjp minister prakash javdekar on aaj kye shivaji narendra modi book  
'ते' वादग्रस्त पुस्तक अखेर मागे घेतलं, भाजपच्या 'या' बड्या मंत्र्याने दिली माहिती   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • आज के शिवाजी- नरेंद्र मोदी पुस्तक अखेर घेतलं मागे
  • पुस्तकावरुन वाद निर्माण झाल्यानंतर लेखकाने माफी मागून पुस्तक घेतलं मागे
  • भाजपचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली माहिती

नवी दिल्ली: दोनच दिवसांपूर्वी 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' हे पुस्तक राजधानी दिल्लीच्या भाजप कार्यालयात प्रकाशित करण्यात आलं होतं. पण यावरुन महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रचंड वाद निर्माण झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यामुळे हे पुस्तक तात्काळ मागे घेण्यात यावं अशी मागणी सर्वच स्तरातू होत होती. यासाठी विरोधकांनी भाजपवर बरीच टीका देखील केली. अखेर आज (मंगळवार) हे पुस्तक मागे घेत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलं आहे. 

'छत्रपती शिवाजी महाराज महान शासक होते. लोककल्याणासाठी शिवाजी महाराजांनी अथक परिश्रम केले. अनेक शतकानंतरही त्यांची चिरंतन प्रेरणा आजही कायम आहे. त्यांची तुलना इतर कुणाशीही होवू शकत नाही. नुकत्याच प्रकाशित पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले. हा वाद आता संपला आहे.' असं म्हणत प्रकाश जावडेकर यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकावरुन राज्यभरात भाजपवर बरीच टीका केली जात होती. अखेर जनक्षोभामुळे जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक मागे घेतलं आहे. 

या संपूर्ण प्रकरणावरुन राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही प्रमुख पक्षांनी भाजपवर निशाणा साधला होता. काँग्रेसने तर याबाबत राज्यभर आंदोलनं करण्याची हाक देखील दिली होती. 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' अशा शिर्षकाचं पुस्तक जय भगवान गोयल या भाजप नेत्याने प्रकाशित केलं होतं. यावेळी पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नरेंद्र मोदींसह छत्रपती शिवाजी महाराज याचा फोटो तुलनात्मक पद्धतीने छापण्यात आला होता. ज्यामुळे यावर बरीच टीका झाली. राज्यातील भाजपच्या अनेक खासदार आणि आमदारांनी देखील हे पुस्तक मागे घ्यावं अशी मागणी केली होती. 

दरम्यान, हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेव्हा याला विरोध सुरु झाला तेव्हापासून आपल्या या पुस्तकाशी काहीही संबंध नसल्याची भूमिका भाजपने घेतली होती. मात्र, त्यानंतरही विरोधकांनी यावरुन भाजपला खंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. अखेर हा वाद अधिक वाढत असल्याचं लक्षात येताच आता हे पुस्तक मागे घेऊन त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे आता याबाबत विरोधक नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी