‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Aug 07, 2022 | 18:46 IST

Azadi Ka Amrit Mahotsav : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये ४२ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

Azadi Ka Amrit Mahotsav 75th Year of Independence Day of India Celebration In Maharashtra
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्त महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
  • पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार
  • राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये ४२ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या १५ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाअंतर्गत राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ही माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ( Azadi Ka Amrit Mahotsav 75th Year of Independence Day of India Celebration In Maharashtra )

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित ‘आझादी का अमृत महोत्सव’ राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या बैठकीस  राष्ट्रीय समितीचे सदस्य, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, देशातील सर्व राज्यांचे राज्यपाल, केंद्रीय मंत्री, राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदी उपस्थित होते. महाराष्ट्राच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीस उपस्थित होते.

मागील वर्षी मार्च महिन्यात मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानावरून राज्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत राज्य शासनाच्या ग्रामीण विभागाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. केंद्र शासनाच्या वेबसाईटवर याबाबतची माहिती अपलोड करण्यात येत आहे व देशात सर्वाधिक कार्यक्रमांचे आयोजन करून महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान मिळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी २५ डिसेंबर रोजी ‘नदी उत्सव’ साजरा झाला. राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजिलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी mahaamrut.org ही वेबसाईट सुरू केली आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येणाऱ्या  ‘घरोघरी तिरंगा’ कार्यक्रम आणि ९ ते १७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या स्वराज्य महोत्सवासाठी राज्य शासनाच्या यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. राज्यातील दोन कोटी घरांवर तिरंगा झेंडा फडकविण्याची योजना आहे. यासाठी खासगी व्यापारी, अन्य संस्था आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून १ कोटी झेंडे उपलब्ध होणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण विकास विभागासाठी अपर मुख्य सचिव आणि नगर विकास विभागासाठी प्रधान सचिवांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांकडून या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वेळोवेळी आढावा बैठकाही घेण्यात येत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या अभियानांतर्गंत विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ३५.४५ कोटींचा निधी जिल्हा स्तरावर वितरीत करण्यात आला आहे.

स्वराज्य महोत्सवांतर्गंत राज्य, जिल्हा,तालुका आणि  ग्राम व  वॉर्ड स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखण्यात आली आहे.   ग्रामस्तरावर आणि वॉर्ड स्तरावर विशेष  सभांचे आयोजन, शाळा महाविद्यालये ,अंगणवाड्या, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिक आदींच्या सहकार्याने हा कार्यक्रम राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ हे आयोजन केवळ सरकारी न ठेवता त्यात लोकांचा अधिकाधिक सहभाग कसा ठेवता येईल, यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत २२ राज्यांच्या कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्रात होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी