मुंबई: भाजपचे (BJP) विधानपरिषदेतील (Legislative Council) नवनिर्वाचित आमदार (MLA) प्रसाद लाड (Prasad Lad) सध्या धास्तावले आहेत. त्यांच्या भितीचे कारण कोणी विरोधी पक्ष नाही, तर त्यांच्या घराबाहेर सापडलेली बॅग आहे. आता तुम्ही म्हणाल लाड साहेब काय बॅग पाहून घाबरतील का? सुरक्षा रक्षक असतानाही अज्ञात व्यक्तीने बॅग त्यांच्या घरासमोर ठेवली. विशेष म्हणजे यापूर्वी लाड यांना जिवे मारण्याच्या धमकीचे फोन आले आहेत. त्याची तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे.
दरम्यान काय प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊ, प्रसाद लाड यांचे निवासस्थान माटुंगा परिसरात आहे. रविवारी पहाटे अज्ञात व्यक्तीने या घराच्या बाहेर बॅग ठेवली. याची माहिती त्यांनी माटुंगा पोलिसांना दिली, पोलिसांनी बॅग तपासली असता यात सोने- चांदी, पैसा, देवतांच्या मूर्त्या आढळल्या. अज्ञात व्यक्तींने लाड यांच्या घरासमोर ही बॅग का ठेवली, या कधी ठेवली याचा तपास अद्याप पत्ता लागलेला नाही. प्रसाद लाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी त्यांना सुरक्षारक्षकाचा फोन आला. त्यांच्या घराबाहेर एक बॅग असल्याची माहिती सुरक्षारक्षकाने दिली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी तात्काळ माटुंगा पोलिसांना फोन केला. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बॅगची तपासणी केली. त्यावेळी पोलिसांना या बॅगेत सोने, चांदी, पैसे आणि देवाच्या मूर्त्या असा ऐवज सापडला. पोलिसांनी पंचनामा करून ही बॅग ताब्यात घेतली.
Read Also : आयआयटीचे तंत्रज्ञान, शेणाद्वारे होणार पाण्याचे शुद्धीकरण
या घटनेविषयी बोलताना लाड म्हणाले की, माझ्या घराबाहेर बंदोबस्त असतानाही अज्ञात व्यक्ती अशाप्रकारे बॅग ठेवून जाते. त्यामुळे मी देखील धास्तावलो आहे. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रसंग घडल्याने माझे कुटुंबीयही घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी व्यक्त केली. दरम्यान, आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करतील. ही बॅग नक्की कोणी लाड यांच्या घराबाहेर सोडली, हे पाहिले जाईल. त्यामुळे आता या तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.
गेल्याच आठवड्यात प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. आपल्याला फोनवर अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली होती. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझ्या जीवाला धोका आहे, असं प्रसाद लाड म्हणाले होते. आम्ही मुंबई पोलिसांच्या संबंधित विभागाला सीडीआर रिपोर्ट काढून मला धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यास सांगितले आहे.
Read Also : ईद निमीत्त शहरातील बाजारात बोकड घरेदीसाठी मोठी गर्दी
काही दिवसांपूर्वीच झालेल्या चुरशीच्या विधानपरिषद निवडणुकीत प्रसाद लाड हे भाजपकडून निवडून आले होते. प्रसाद लाड हे भाजपचा पाचवा उमेदवार म्हणून रिंगणात उतरले होते. भाजपकडे पुरेशी मतं नसतानाही प्रसाद लाड यांनी विजयी होण्याची किमया करून दाखवली होती. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील सहकाऱ्यांपैकी एक आहेत.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.