बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात झाला. समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकारक ठाकरे यांचा मुलगा ही बाळ ठाकरे यांची पहिली ओळख.
बाळ ठाकरेंच्या कारकिर्दीची सुरुवात 1950 मध्ये फ्री प्रेस जर्नलधील व्यंगचित्रकार या पदावरील नोकरीने झाली. जेमतेम 10 वर्ष काम केल्यानंतर 1960 मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. यानंतर बाळ ठाकरे यांनी 'मार्मिक' नावाचे व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले. मार्मिकमधून त्यांनी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. 'वाचा आणि स्वस्थ बसा' नावाचे सदर सुरू केले. मोठमोठ्या सरकारी आणि खासगी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्यांच्या याद्या छापल्या. या याद्यांमध्ये एकही मराठी नाव दिसत नव्हते. याचा परिणाम लवकरच दिसू लागला... मराठी माणसाला, भूमिपुत्राला रोजगार मिळावा यासाठी मराठी माणूस एकवटू लागला. हीच ती वेळ होती जेव्हा प्रबोधनकारांनी संघटना उभी करण्याचा सल्ला दिला आणि शिवसेना स्थापन झाली.
शिवसेना स्थापन झाली तो दिवस होता 19 जून 1966. शिवसेना स्थापन करताना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण अशी बाळासाहेबांनी भूमिका मांडली होती. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा मुंबईत शिवाजी पार्कच्या मैदानात झाला. मराठी माणसांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. पुढे पक्षाची भूमिका मांडण्यासाठी 1989 मध्ये त्यांनी सामना नावाचे दैनिक सुरू केले.
देशविघातक कृत्ये करणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असा विचार मांडत बाळ ठाकरे यांनी पक्षाचा विस्तार सुरू केला. मराठी माणसाच्या भल्यासाठी काम करावे, जातीपातीच्या राजकारणात अडकण्यापेक्षा जनतेच्या भल्यासाठी काम करावे असे विचार मांडत आणि जनतेमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य शिवसैनिकांना महत्त्वाची पदे मिळवून देत बाळ ठाकरे यांनी शिवसेना हा पक्ष मोठा केला. या प्रयत्नांमुळेच त्यांना बाळासाहेब ठाकरे ही नवी ओळख मिळाली.
काही वर्षांनंतर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी युती झाली. यानंतर शिवसेनेची राजकीय ताकद झपाट्याने वाढली आणि 1995 मध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. मनोहर जोशी यांच्या रुपाने पहिल्यांदाच एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला.
ठाम हिंदुत्ववादी भूमिका घेत बाळासाहेबांनी देश आणि महाराष्ट्रात राजकारण सुरू केले. यातूनच बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट ही नवी ओळख मिळाली. वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता असलेल्या महाराष्ट्रात दुसरे पक्ष सत्तेत येऊ शकतात हे शिवसेनेच्या नेतृत्वात शिवसेना भाजप युतीने करून दाखवले. अशक्यप्राय वाटणारी राजकीय आव्हाने बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने पूर्ण करून दाखवली. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या आणि मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचे पुढे वाढते वय आणि आजारपण यामुळे 17 नोव्हेंबर 2012 रोजी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. त्यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.... बाळासाहेबांचे निधन झाले तरी शिवसेना म्हणजे बाळासाहेब आणि बाळासाहेब म्हणजे शिवसेना हे लोकांच्या हृदयात आजही कायम आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.