मुंबई : हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य-दिव्य पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात येत आहे. या पुतळ्याचे दिमाखदार लोकापर्ण शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी शनिवारी, २३ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असणार आहेत.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस हे विशेष अतिथी असतील.
या सोहळ्याला विशेष आतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी उपस्थित राहणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
ज्वलंत हिंदुत्वाचे सरसेनापती, मराठी माणसांच्या मनात आत्मसन्मानाचे स्फुलिंग चेतवणारे आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल केवळ मुंबई- महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देश-विदेशात प्रचंड कुतूहल आहे. त्यांचे विचार आणि सामाजिक कार्याचे स्मरण लोकांसमोर कायम रहावे, यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे.
शिवसेनाप्रमुखांचा मुंबईत उभारला जाणारा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. नऊ फुटी उंच व १२०० किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्यावतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकार केला.
कोरोना संकटामुळे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. मात्र, बाळासाहेबांच्या असंख्य चाहत्यांसाठी या सोहळ्याचे ऑनलाइन प्रेक्षपण केले जाणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.