महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर बंदी आणा: चित्रा वाघ

ban social media apps who morphed women images demand chitra wagh लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे महिलांचे फोटो मिळूवन त्यांचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर बंदी घालण्याची मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली.

Chitra Wagh
महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर बंदी आणा: चित्रा वाघ 

थोडं पण कामाचं

  • महिलांच्या फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर बंदी आणा: चित्रा वाघ
  • अश्लील पद्धतीने फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जात आहेत
  • दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना अॅप बंदीसाठी चित्रा वाघ यांचे पत्र

मुंबईः मागील काही दिवसांत सोशल मीडियात नवी अॅप कार्यरत झाली आहेत. ही अॅप मुलींचे आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावरुन संकलित करतात आणि त्या फोटोंना मॉर्फ करुन अश्लील पद्धतीने वापरले जाते. या प्रकरणी केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे आणि असे प्रकार करणाऱ्या अॅपवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून अॅप प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.

मागील काही दिवसांत वेगवेगळ्या निमित्ताने आवाहन करुन फोटो मागवणारी सोशल मीडिया अॅप वाढली आहेत. यातील काही अॅप फोटोच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाविषयी भाष्य करतात तर काही अॅप भविष्य वर्तविण्याचा दावा करतात. काही अॅप अपलोड केलेल्या फोटोवरुन संबंधित व्यक्ती विशिष्ट वयात कशी दिसेल अथवा विशिष्ट कपड्यांमध्ये कशी दिसेल हे दाखवणारे फोटो तयार करुन देतात. आपल्याला हे फोटो सोशल मीडियावर स्वतःच्या अकाउंटमधून (टाइमलाइन) पोस्ट करण्याची संधी उपलब्ध असते. या फोटोंना ओळखीतली मंडळी मोठ्या संख्येने लाइक करतात, त्यावर कमेंट करतात. याच कारणामुळे सोशल मीडियावर अनेकजण फोटोंशी संबंधित अॅपचा वापर करत आहेत, त्यात स्वतःचा फोटो अपलोड करत आहेत. अनेक युझर गंमत म्हणून सोशल मीडियावरची अॅप वापरतात. मात्र ही अॅप त्यांची सेवा देण्याच्या बदल्यात तुमचा फोटो आणि इतर महत्त्वाची माहिती यांचा अॅक्सेस मिळवतात. अथवा ही माहिती तुम्हाला अॅपवर नोंदवण्यास भाग पाडतात. मिळालेल्या खासगी माहितीचा अॅप नियंत्रकांकडून गैरवापर होत आहे. या प्रकारात सरसकट सर्व अॅप नसली तरी अनेक सोशल मीडिया अॅपमागील टीम गुंतल्या आहेत. 

अॅपद्वारे मुलींचे आणि महिलांचे जास्तीत जास्त फोटो मिळवायचे. फोटोशॉपसारख्या एखाद्या सॉफ्टवेअरच्या मदतीने हे फोटो मॉर्फ करायचेय आणि अश्लील पद्धतीने वापरायचे प्रकार सुरू झाले आहेत. लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने फोटो मिळवायचे आणि अश्लिलतेसाठी प्रसिद्ध असलेल्या वेबसाइट आणि अॅप अशा ठिकाणी फोटोंचा गैरवापर करायचा असे प्रकार सुरू आहेत. मागे अशाच प्रकारात पाकिस्तानचे कनेक्शन उघड झाले होते. ही बाब अतिशय गंभीर आहे. भारतीय मुली आणि महिलांची नाहक बदनामी होऊ नये, त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागू नये यासाठी फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर बंदी घालण्याची मागणी चित्रा वाघ यांनी दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र पाठवून केली आहे. 

सणासुदीच्या दिवसात चांगले कपडे घालून फोटो काढणे अनेकांना आवडते. हे फोटो उत्साहाच्या भरात सोशल मीडियावर अपलोड केले जातात. एकदा सोशल मीडिया प्रोफाइचा अॅक्सेस मिळाला की गैरवापराच्या हेतूने सक्रीय असलेली अॅप हे चांगले फोटोही मिळवतात आणि त्यांचा गैरवापर करतात. त्यामुळे फोटोंचा गैरवापर करणाऱ्या अॅपवर भारतात बंदी घालणे हाच व्यावहारिक पर्याय असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. देशातील मुली आणि महिलांच्या खासगी जीवनाच्या सुरक्षेचा मुद्दा म्हणून केंद्र सरकारने तातडीने अॅप प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी त्यांनी केली.

.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी