BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मुंबईत बस वाहतूक विस्कळीत

मुंबई
रोहन जुवेकर
Updated Apr 21, 2022 | 13:23 IST

BEST contract based employees start no work agitation : मुंबईत बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. 

BEST contract based employees start no work agitation
BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मुंबईत बस वाहतूक विस्कळीत  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • BESTच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, मुंबईत बस वाहतूक विस्कळीत
  • सात महिने पगार दिलेला नाही, कर्मचाऱ्यांची तक्रार
  • टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलच्या दिशेने जाणारी बस वाहतूक कोलमडल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे हाल

BEST contract based employees start no work agitation : मुंबई : एसटीचे ३४ हजार कर्मचारी अद्याप संपावर आहेत. हा तिढा सुटण्याआधीच मुंबईत बेस्टच्या (Brihanmumbai Electric Supply and Transport - BEST) कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मुंबईत बेस्ट बसची वाहतूक विस्कळीत होण्यास सुरुवात झाली आहे. 

टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलच्या दिशेने जाणारी बस वाहतूक कोलमडल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातलगांचे हाल होत आहेत. मागील सात महिन्यांचा पगार मिळाला नाही त्यामुळे जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत काम करणार नाही, असे जाहीर करून कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाची सुरुवात होताच मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटलच्या दिशेने जाणारी बस वाहतूक कोलमडली. 

भारतातून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी टाटा कॅन्सर हॉस्पिटल आणि केईएम हॉस्पिटल येथे येत असतात. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा फटका या रुग्णांना आणि त्यांच्या नातलगांना बसला आहे. 

सात महिने पगार दिलेला नाही. या प्रकरणात वारंवार तक्रार करण्याचे प्रयत्न केले तर लवकरच पगार होणार असे तोंडी सांगितले जाते पण वरिष्ठ अधिकारी भेटत नाहीत किंवा लेखी स्वरुपात आश्वासन दिले जात नाही. अद्याप हक्काचा पगार मिळालेला नाही. आता विनापगार काम करणे अनेकांना आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे; असे आंदोलकांचे म्हणणे आहे. पगाराअभावी घर चालविणे कठीण झाल्याचे बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

आंदोलन सुरू झाल्यानंतर बेस्टच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाल्याचे वृत्त आहे. आंदोलनामुळे विस्कळीत झालेली बस यंत्रणा सुरळीत कशी करायची या प्रश्नावर चर्चा सुरू असल्याचे संकेत अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी