बिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन कापणार; बेस्टचा इशारा

BEST pending electricity bills cross INR 100 crores mark बिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन कापणार; असा इशारा प्रामुख्याने मुंबई शहर परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या 'बेस्ट'ने नागरिकांना दिला.

BEST pending electricity bills cross INR 100 crores mark
बिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन कापणार; बेस्टचा इशारा 

थोडं पण कामाचं

  • बिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन कापणार; बेस्टचा इशारा
  • वीज बिलांची थकीत रक्कम १०० कोटींपेक्षा जास्त
  • सर्वसामान्य नागरिकांकडे थकीत रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावणार

मुंबईः बिल भरा, नाहीतर वीज कनेक्शन कापणार; असा इशारा प्रामुख्याने मुंबई शहर परिसरात वीज पुरवठा करणाऱ्या 'बेस्ट'ने नागरिकांना दिला. वीज बिलांची थकीत रक्कम १०० कोटींपेक्षा जास्त झाल्यामुळे 'बेस्ट'ने नागरिकांकडे वसुलीचा तगादा लावण्याची तयारी केली आहे. (BEST pending electricity bills cross INR 100 crores mark)

थकीत रकमेवरील व्याज माफ, दंड माफ, थकीत रक्कम तीन हप्त्यांमध्ये भरण्याची मुभा अशा योजना बेस्ट प्रशासनाने जाहीर केल्या. या योजना जाहीर करुनही थकीत रक्कम १०० कोटींपेक्षा जास्त असल्यामुळे नागरिकांकडे वसुलीचा तगादा लावणार असल्याचे संकेत 'बेस्ट'ने दिले. 

अनेक सरकारी इमारती आणि सरकारी बंगल्यांच्या बिलाची रक्कम थकीत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी निवडक प्रसारमाध्यमांनी दिले होते. या थकीत रकमेपैकी किती वसुली झाली किंवा किती रकमेसाठी तगादा लावण्याचे काम सुरू आहे हे 'बेस्ट'ने अद्याप जाहीर केलेले नाही. मात्र सर्वसामान्य नागरिकांकडे थकीत रकमेच्या वसुलीसाठी तगादा लावणार असल्याचे स्पष्ट संकेत 'बेस्ट'ने दिले.

याआधी ऑक्टोबर महिन्यात बेस्ट उपक्रमाचे (Brihanmumbai Electric Supply and Transport - BEST) २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठीचे १ हजार ८८७ कोटी रुपये तुटीचे बजेट (Budget) सादर झाले. बेस्टचा परिवहन विभाग दीर्घकाळापासून तोट्यात होता. मात्र उपक्रमाचा विद्युत विभाग परिवहनच्या तुलनेत चांगल्या स्थितीत होता. पण २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात विद्युत पुरवठा विभागाची २६३.५९ कोटी रुपयांची तूट बजेटमध्ये दाखवण्यात आली. ज्या विद्युत विभागावर अवलंबून बेस्टचा परिवहन विभाग स्वतःला सावरायचा तो डोलारा एकदम कोसळला. बेस्टचे आर्थिक गणित कोलमडले. 

बेस्ट उपक्रमाने दिलेल्या आकडेवारीनुसार विद्युत पुरवठा विभागाचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे बजेट २६३.५९ कोटी रुपये तुटीचे आहे. तसेच परिवहन विभागाचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे बजेट १६२४.२४ कोटी रुपये तुटीचे आहे. यामुळे मुंबई मनपाच्या बेस्ट उपक्रमाचे २०२१-२०२२ या आर्थिक वर्षाचे एकूण बजेट १८८७.८३ कोटी रुपये तुटीचे झाले आहे. बेस्ट उपक्रमाची बिकट आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन मुंबई मनपाने बेस्ट उपक्रमाला २०२१-२०२२ या आर्थिक वर्षासाठी ७५० कोटी रुपये एवढ्या आर्थिक आधाराची तरतूद केली आहे.

कोरोना संकटामुळे कोलमडले बेस्टचे गणित

बेस्ट उपक्रम मागील दशकापासून आर्थिक तुटीत आहे. ही तूट वाढू लागल्यावर मुंबई मनपाने नियोजन आराखड्यानुसार बेस्ट उपक्रमात अनेक बदल केले. तसेच जुलै २०१९ पासून बेस्टच्या बस वाहतुकीच्या दरांमध्ये मोठी कपात केली. बसच्या तिकिटाचे दर एकदम कमी करण्यात आले. दर कपातीनंतर बेस्टच्या प्रवाश्यांमध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली. तसेच मुंबई मनपाने आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला. यामुळे आर्थिक संकट दूर होईल आणि उपक्रमाला 'बेस्ट' दिवस येणार अशी आशा वाटत होती. याच सुमारास कोरोना संकटाने धडक दिली. लॉकडाऊन आणि कोविड प्रोटोकॉल यांचे पालन करताना बेस्टचे तसेच मुंबई मनपाचे आर्थिक गणित कोलमडले. या घडामोडींचा थेट प्रतिकूल परिणाम बेस्ट उपक्रमाच्या आर्थिक गणितावर झाला. या अडचणींमधून सावरण्यासाठी वीज बिलांच्या वसुलीकरिता नागरिकांकडे तगादा लावण्याचे संकेत 'बेस्ट'ने दिले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी