Koshyari explanation : मराठींना कमी लेखण्याचा हेतू नव्हता, वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण, मराठी माणसाच्या योगदानाचा केला गौरव

मुंबई
अमोल जोशी
Updated Jul 30, 2022 | 14:28 IST

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

Koshyari explanatio
वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं वक्तव्य  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं स्पष्टीकरण
  • विधानाचा विपर्यास केला गेल्याचा दावा
  • एकाचा गौरव हा दुसऱ्याचा अपमान नसतो - कोश्यारी

Koshyari Explanation : मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांनी आपला पैसा काढून घेतला तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी उरणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या विधानाबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसांना कमी लेखण्याचा किंवा दुखावण्याचा आपला हेतू नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे. शुक्रवारी अंधेरीतील एका चौकाच्या नामकरण समारंभात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर चहूबाजूंनी टीका होऊ लागल्यामुळे अखेर कोश्यारींना स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. 

काय म्हणाले कोश्यारी?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या योगदानाचा गौरव केला आहे. मुंबई ही महाराष्ट्राचा स्वाभिमान तर आहेच आणि देशाची आर्थिक राजधानीदेखील आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या स्पष्टीकऱणात राज्यपाल म्हणतात, “छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी माणसाच्या या भूमीत राज्यपाल म्हणून मला सेवेची संधी मिळाली, याचा मला अभिमानच आहे. त्याचमुळे अतिशय अल्पावधीत मराठी भाषा अवगत करण्याचा मी प्रयत्न केला. काल राजस्थानी समाजाच्या कार्यक्रमात मी जे विधान केले त्यात मराठी माणसाला कमी लेखण्याचा माझा कुठलाही हेतू नव्हता. केवळ गुजराती आणि राजस्थानी मंडळांनी व्यवसायात दिलेल्या योगदानावर मी बोललो. मराठी माणसांनीच कष्ट करून महाराष्ट्राला उभे केले. म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक नावाजलेले आहेत. ते केवळ महाराष्ट्रात नाही, तर भारतात आणि जगभरात मोठ्या दिमाखात मराठीचा झेंडा रोवून आहेत. त्यामुळे मराठी माणसाचे योगदान कमी लेखण्याचा कुठे प्रश्नच निर्माण होत नाही.”

अधिक वाचा - Uddhav Thackeray: 'राज्यपालांच्या बेताल विधानाचा समाचार घेणार', उद्धव ठाकरेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद

विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा

आपला बोलण्याचा उद्देश वेगळा होता, मात्र आपल्या विधानाचा विपर्यास केला गेल्याचा दावा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केला. आपल्या स्पष्टीकरणात ते म्हणतात, “माझ्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता, पण नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये. किमान माझ्या हातून तरी मराठी माणसाचा अवमान कधीही होणार नाही. विविध जाती, समुदाय यांनी नटलेल्या या मराठी भूमीच्या प्रगतीत, विकासात सर्वांचेच योगदान आहे आणि त्यातही मराठी माणसाचे योगदान अधिक आहे."

अधिक वाचा - नितेश राणेंकडून राज्यपालांच्या विधानाचं समर्थन

सर्वपक्षीयांची टीका

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादाचे पडसाद शनिवारी सकाळपासूनच माध्यमात आणि समाजात उमटायला सुरुवात झाली होती. महाराष्ट्रातील तमाम राजकीय पक्षांनी कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आता कोश्यारींनी स्पष्टीकरण दिल्यानंतर हा वाद शांत होणार की पुढे सुरुच राहणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी