मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Panchayat Samiti Election) संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या निवडणुकीच्या संदर्भातील आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली आहे. राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 5 जुलै, 2022 रोजीच्या पत्रान्वये संबंधित जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम दिला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेसंदर्भात आज सुनावणी झाली. एका आठवड्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.
हे पण वाचा: पूर आलेली नदी ओलांडताना प्रवाशांनी भरलेली स्कॉर्पिओ गेली वाहून, धक्कादायक VIDEO आला समोर
या पार्श्वभूमीवर आरक्षण सोडतीचा कार्यक्रम स्थगित केला आहे. सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश देण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या 5 जुलै 2022 च्या आदेशान्वये, राज्यातील 25 जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या 284 पंचायत समिती निर्वाचक गणातील आरक्षित जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा कार्यक्रम प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निर्वाचक गणाचे आरक्षण 13 जुलै रोजी सोडत काढून निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
मात्र, राज्य निवडणूक आयोगाच्या 12 जुलै 2022 रोजीच्या आदेशान्वये आता जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.