मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीनंतरही राज्य सरकारकडून मदत घोषित करण्यात विलंब होत असल्याचा आरोप करत सरकारविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता अखेर ठाकरे सरकारने (Thackeray Government) मदतीची घोषणा केली आहे. शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.
महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पण जवळपास दोन महिने झाले तरी राज्य सरकारकडून मदतीची घोषणा होत नाही, असे म्हणत विरोधकांकडून वारंवार टीका केली जात होती. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशाराच दिला होता. शेतकऱ्यांचा दसरा अंधारात गेला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असं राजू शेट्टी थेट राज्य सरकारला उद्देशून म्हणाले होते. याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारला शेतकरी मदतीवरुन घेरले होते. “अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी मुख्यमंत्री फक्त भाषण करतात. भाषणाने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तत्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असे राजू शेट्टी म्हणाले होते.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.