शेवटच्या क्षणी कोंडी फोडण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला मोठी ऑफर

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 08, 2019 | 16:05 IST

BJP And Shiv Sena: मुदतीआधी सत्तास्थापन व्हावी यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठीच आता भाजपकडून एक लेखी मसुदा तयार केला जात आहे.

big offer from bjp to shiv sena at last minute
शेवटच्या क्षणी कोंडी फोडण्यासाठी भाजपकडून शिवसेनेला मोठी ऑफर   |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भाजपकडून कोंडी फोडण्याचे जोरदार प्रयत्न
  • शिवसेनेने चर्चेसाठी तयार व्हावं यासाठी भाजप लेखी मसुदा देणार
  • शिवसेना अद्यापही मुख्यमंत्रीपदावर ठाम, भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण

मुंबई: सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत आता एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवसेना-भाजप यांच्यातील कोंडी फुटण्याची शक्यता आहे. 'वर्षा' बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची तब्बल तासभर बैठक पार पडल्यानंतर आता कोंडी फोडण्यासाठी भाजप एक पाऊल पुढे टाकत असल्याचं म्हटलं जात आहे. भाजप अडीच वर्षांसाठी शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्यावर ठाम असताना याचबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलं होतं की, 'शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याबाबत कोणतंही आश्वासन दिलेलं नाही.' याच वक्तव्यानंतर भाजप आणि शिवसेनेमधील संवाद पूर्णपणे खुंटला आहे. त्यानंतर आता हे वक्तव्य मागे घेण्यासाठी भाजपकडून एक मसुदा तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने दुखावलेल्या शिवसेनेला चुचकारण्यासाठी भाजपकडून आता 'मसुदा' तयार केला जात आहे. या मसुद्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील दुरावा नाहीसा होऊन शिवसेनेकडून चर्चा सुरु होईल असा भाजपमधील काही नेत्यांचा होरा आहे. त्यासाठीच आता मसुदा फॉर्म्युला वापरण्यात येत आहे. याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहे. याच पत्रकार परिषदेत फडणवीस एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, भाजपच्या या मसुद्याबाबत शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार, शिवसेना भाजपसोबत चर्चा करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

फडणवीसांच्या 'या' वक्तव्यामुळे भाजप-शिवसेनेत आला दुरावा 

'अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद हा शब्द वाटाघाटीत कधीच दिला नव्हता. चर्चेत बसल्यानंतर शिवसेनेची काय मागणी आहे,  त्यावर चर्चा होईल. मेरिटवर मागण्या मान्य करून अगदी आडमुठी भूमिका घेणार नाही.' मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त आयोजित अनौपचारीक गप्पाच्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. 

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. 'माझं जे अमित शहा यांच्यासोबत ठरलं होते ते त्यांनी करावं. आम्ही स्थीर सरकार देऊ. मुख्यमंत्र्यांनी दिवाळीनिमित्त आयोजित अनौपचारीक गप्पाच्या कार्यक्रमात ते विधान करायला नको होते.' असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी