'बर्ड फ्लू'ची बाधा माणसांना होत नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका - पशुसंवर्धन मंत्री

Bird Flu: कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा जोडधंदा आहे. चिकन तसेच अंडी यामध्ये कोणतीही भेसळ राहत नाही. शिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात.

bird flu
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: PTI

नागपूर : 'बर्ड फ्लू' (Bird flu)मुळे कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू होत नाही. समाज माध्यमांवर (Social media) फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्यांना पारितोषिक दिले जाईल असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्सविकास मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी केले आहे. बर्ड फ्लू विषाणूची बाधा मानवाला होत नाही. यासाठी चिकन तसेच अंडी सेवन करताना भीती बाळगू नका. कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा जोडधंदा आहे. चिकन तसेच अंडी यामध्ये कोणतीही भेसळ राहत नाही. शिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात. जर कोणी व्यक्ती बर्ड फ्लूमुळे दगावल्याचे दाखविल्यास त्याला रोख बक्षिस देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी न घाबरता चिकन अंडी सेवन करावे. पुढील आठवड्यात शहरात चिकन-अंडी मोहोत्सव राबवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी भवन येथे विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, त्यावेळी मंत्री सुनील केदार बोलत होते. विदर्भ पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजा दुधबडे, सचिव डॉ. गजानन वानखेडे,सहसचिव हुसेन शेख, उपाध्यक्ष डॉ. सुरेंद्र राऊत तसेच शेतकरी प्रतिनिधी डॉ. पिंकी इंगेवार, प्रेमचंद पाटील उपस्थित होते. 

हे करा

पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसेच विष्ठे सोबत संपर्क टाळा. पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा. शिल्लक उरलेल्या मांसाची योग्य व्हिलेवाट लावा. एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्ष्याला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसेच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा. कच्या पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना पाणी व साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा. कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा. पूर्ण शिजवलेले मांस खा. आपल्या परिसरात जलाशय किंवा तला असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणे वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागास कळविणे आवश्यक आहे. 

हे करू नका

कच्चे चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका. अर्धवट शिजलेले मांस, चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका. आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्ष्याच्या संपर्कात येऊ नका. पूर्णपणे शिजलेले मांस आणि कच्चे मांस एकत्र ठेवू नका.

टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

राज्यातील कोणत्याही गावात कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात याची माहिती द्या. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी