CM Eknath Shinde : मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला असेही शिंदे म्हणाले. आज विधानसभेचे विषेष अधिवेशन आहे, या अधिवेशनात शिंदे यांनी आज भाषण केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या १० ते १५ दिवसांत ज्या काही घडामोडी घडल्या, त्याचे आपण सर्वच जण साक्षीदार आहोत. आज राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार स्थापन झाले आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची वैचारिक भूमिका घेऊन आम्ही पुढे घेऊन निघालो आहोत. आतापर्यंत विरोधक सत्ताधार्यांकडे जाण्याचा प्रघात होता. परंतु पहिल्यांदाच सत्ता सोडून माणसं बाहेर पडली आहेत. मी नगरविकास मंत्री होतो आणि माझ्यासोबत ८ ते ९ मंत्री सत्तेतून पायउतार झाले. एकीकडे दिग्गज नेते होते ज्यांनी देशाचे नेतृत्व केले तर एकीकडे हा बाळासाहेब ठाकरे यांचा आणि आनंद दिघे यांचा एक शिवसैनिक होता. परंतु या ५० आमदारांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला हे मी माझे भाग्य समजतो असे शिंदे म्हणाले.
शिंदे म्हणाले की, आम्हाला सांगण्यात आलं की २० ते २५ बंडखोर आमदार त्यांच्या संपर्कात आहेत, मी म्हटलं की त्यांची नावं सांगा विशेष विमानाने मी त्यांना परत पाठवतो. एका आमदाराला चार्टड विमानाने घरी पाठवल. यात कुठलाही जोरजबरदस्तीचा प्रश्न नाही. ११५ आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी होते. माझ्याकडे ५० आमदार होते. फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्रिपदासाठी समर्थन दिले. यासाठी शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आभार मानले.
शिंदे म्हणाले की, सर्वांना वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांना काय मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. परंतु मला काही नको हवं होतं. परंतु भारतीय जनता पक्षाने माझा सन्मान केला. लोकशाही आणि वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. आता फक्त मी पार्श्वभूमी सांगितली उद्या मी पूर्ण विस्ताराने सांगेन असेही शिंदे यांनी नमूद केले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.