'पवारांनी उसनं अवसान आणू नये', भाजप नेत्याची बोचरी टीका 

मुंबई
रोहित गोळे
Updated Feb 14, 2020 | 13:59 IST

भाजपने व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली त्यामुळे आता शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केली आहे. 

bjp leader madhav bhandari criticized  sharad pawar on vip culture
'पवारांनी उसनं अवसान आणू नये', भाजप नेत्याची बोचरी टीका (फाईल फोटो)  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई: 'भारतीय जनता पक्षानेच व्हीआयपी संस्कृती मोडीत काढली. त्यामुळे सत्तेसाठी भुकेलेल्या शरद पवारांनी उसनं अवसान आणू नये.' अशी गंभीर टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते  माधव भांडारी यांनी केली आहे. त्यामुळे आता यावरुन भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार जुंपण्याची शक्यता आहे. 

'राज्यात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी सेल्यूट करण्याची पद्धत राज्याचे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बंद करायला लावली. तशा सूचनाच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात हीव्हीआयपी संस्कृती मोडीत काढण्याचा निर्णय घेतला व तो अंमलातही आणला.' असा दावा भांडारी यांनी यावेळी केला. 

'लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा लाल दिव्याची संस्कृती बंद दोन वर्षांपूर्वीच केली आहे. यामुळे आता पवार साहेबांनी उसने अवसान आणू नये. असा टोला माधव भांडारी यांनी लगावला आहे. आता माधव भांडारी यांच्या टीकेला राष्ट्र्रवादी काँग्रेस काय उत्तर देणार याकडेच सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे. 

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल (गुरुवार) असं म्हटलं की, 'शरद पवार यांच्यावर आपल्याला पीएचडी करायची आहे. १० खासदार नसणारे पवार हे कायम राजकारणाच्या केंद्रस्थानी असतात. एकाच वेळी सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांशी बोलणी करुन त्यांची समजूत काढतात.'

दरम्यान,  राज्यात सत्ताबदल झाल्यापासून भाजपकडून सतत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना लक्ष्य केलं जात असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.  राज्यातील तीन पक्षांचं हे जास्त दिवस सत्तेत राहणार नसल्याचं भाजपच्या नेत्यांकडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस हे तीनही पक्ष आता एकमेकांना सांभाळून राज्यातील सत्ता कशी चालवतात यावर पुढील अनेक राजकीय गणितं अवलंबून असणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी