Bjp Leader Pravin Darekar File Nomination From Labour Category For Mumbai District Central Co-Op Bank Election मुंबईः मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठीची निवडणूक २ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. विशेष म्हणजे दरेकर यांनी मजूर संस्था प्रवर्गातून अर्ज दाखल केला आहे. गेली अनेक वर्षे दरेकर हे बँकेचे अध्यक्ष असून मजूर प्रवर्गातूनच निवडून येत आहेत. यंदा त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
सहकार सुधार पॅनेलचे अंकुश जाधव, संभाजी भोसले यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दरेकरांनी ज्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला आहे त्याविषयी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे मजूर प्रवर्गातील अर्ज बाद झालाच तर प्रवीण दरेकर यांच्यासाठी नागरी बँकांच्या वर्गवारीतूनही संचालकपदासाठी अर्ज भरण्याचा पर्याय खुला असेल.
अंगमेहनत करणाऱ्यास मजूर म्हणून गणले जावे, अशी मजूर सहकारी संस्थांच्या उपविधित मजुराची व्याख्या आहे. दरेकर या व्याख्येत बसत नाहीत. पण निवडणुकीसाठी विचारात घेतलेल्या मतदारयादीत त्यांचा समावेश मजूर या प्रवर्गात आहे. ही मतदारयादी निवडणूक प्रक्रियेसाठी विचारात घेतली आहे. यामुळे तांत्रिक नियमावर बोट ठेवून दरेकर यांनी पुन्हा एकदा मजूर प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
आतापर्यंत प्रवीण दरेकर, आनंदराव गोळे आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. त्यामुळे या तिघांची संचालकपदी बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. उर्वरित अठरा उमेदवारांचीही बिनविरोध निवड व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
अलिकडेच भाजपच्या प्रसाद लाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा झाली. प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.