BJP MLA Ameet Satam wrote letter to CM : मुंबई : मुंबई महापालिकेच्या हद्दीतील मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव देण्याचा विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 'टिपू सुलतान' प्रकरणी भारतीय जनता पार्टीचे आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवले आहे. या पत्रात काही गंभीर मुद्दे मांडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ज्या मैदानाला 'टिपू सुलतान' हे नाव दिले ती जागा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी राखून ठेवल्याची नोंद महसूल पत्रकात आहे. जर नियोजन आधी झाले होते तर या जागेवर खेळाचे मैदान कसे तयार करण्यात आले आणि मैदान तयार केले तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे भवितव्य काय; हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. मैदानाच्या कामाच्या निमित्ताने प्रथमदर्शनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा गैरवापर झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे. चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करावी; अशीही मागणी आमदार अमीत साटम यांनी केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर 'टिपू सुलतान क्रीडांगण' हे नामकरण अवैध आहे असे जाहीरपणे सांगतात. या फलकामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल असेही म्हणतात आणि फलकाचा बचाव करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून त्यांचा वापर करत असल्याचे दिसते; असा आरोप आमदार अमीत साटम यांनी केला.
जर 'टिपू सुलतान क्रीडांगण' हे नामकरण अवैध आहे तर मैदानाच्या नावाचा फलक तातडीने हटविणे आवश्यक आहे. महापौरांनी या कामाला प्राधान्य देणे अपेक्षित आहे. पण राजकीय विरोधकांनी नावाला विरोध करताच महापौरांनी पालकमंत्र्यांचे समर्थन करायला सुरुवात केली आहे. हा प्रकार धक्कादायक असल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.