शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, भाजपवर अतिशय मोठा आणि गंभीर आरोप 

मुंबई
रोहित गोळे
Updated Nov 08, 2019 | 12:41 IST

भाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी कोटी-कोटी रुपयांची ऑफर आमदारांना दिली जात आहे. असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

bjp offers rs 50 crore to shiv sena mla vijay wadettiwar accuses on bjp
शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर, भाजपवर अतिशय मोठा आणि गंभीर आरोप (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आमदारांना कोट्यवधी रुपयांची भाजपकडून ऑफर
  • काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर गंभीर आरोप
  • संजय राऊतांपाठोपाठ आता काँग्रेसकडूनही भाजपवर घोडेबाजार सुरु असल्याचा आरोप

मुंबई: 'भाजपकडून शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. तसंच काँग्रेसच्या आमदारांना संपर्क देखील करण्यात आला आहे. पण आमचे आमदार भाजपच्या प्रलोभनांना कधीही बळी पडणार नाही.' असा गंभीर आरोप काँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यामुळे आता सत्ता संघर्षावरुन मोठा वाद पेटला आहे. दरम्यान, कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसच्या सर्व आमदारांना जयपूरला हलविण्यात आलं असल्याचं समजतं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही म्हटलं आहे की, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आमदार फोडण्याचे प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे आता सर्वच बाजूंनी भाजपवर टीकेची झोड सुरु झाली आहे. 

'जर भाजप आणि शिवसेनेला जनतेनं बहुमत दिलं आहे तर त्यांनी सरकार स्थापन केलं पाहिजे. पण हे लोकं सत्तेला चिकटून बसले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा सगळा गोंधळ भाजपमुळेच निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या आमदारांना ५० कोटींची ऑफर दिली जात आहे. तसंच आमच्या आमदारांना देखील फोन करण्यात आले. पण आमचे आमदार भाजपच्या प्रलोभनांना अजिबात बळी पडणार नाही.' असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.  

'जो कोणी गद्दारी करेल त्याला घरची वाट दाखवू'

'आम्ही आमदारांना आधीच सांगितलं आहे की, असे फोन आल्यास ते फोन रेकॉर्ड करा. त्यामुळे भाजपने सत्तेसाठी घोडेबाजार सुरु केला आहे. पण आता हा घोडेबाजार उघड झालाच पाहिजे. आमचे आमदार फुटणार नाही. पण जर कोणी गद्दारी केली तर त्या आमदाराविरोधात आम्ही सर्वजण एकच उमेदवार देऊन गद्दार आमदाराला घरचा रस्ता दाखवू.' असा इशाराच वडेट्टीवार यांनी आपल्या आमदारांना दिला आहे.  

दरम्यान, आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील असाच आरोप केलेला आहे.  'घोडेबाजारासाठी सत्ता आणि पैशाचा वापर सुरु आहे. पडद्यामागून कर्नाटक पॅटर्न सुरु आहे. कुणी कर्नाटक पॅटर्न चालविण्याच प्रयत्न करत असेल तर यशस्वी होणार नाही. त्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊ.' असं संजय राऊत यावेळी म्हणाले 

दुसरीकडे भाजपने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी या सगळ्या आरोपाचं खंडन केलं आहे. 'भाजप आणि सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी काँगेस सतत खोटे आरोप करत आहेत.' असं राम कदम म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी