मुंबईतील सर्व २४ विभागात रुग्ण डबलिंगचा कालावधीची 'शंभर' दिवसांवर

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने २१ ऑक्टोबर २०२० रोजी शतक गाठले.

BMC all 24 ward patient doubling rate goes to 100 days
मुंबईतील सर्व २४ विभागात रुग्ण डबलिंगचा कालावधी इतका 

थोडं पण कामाचं

  • ५ विभागात १७५ पेक्षा अधिक, ६ विभागात १५० पेक्षा अधिक, ७ विभागात १२५ दिवस कालावधी
  • रुग्ण वाढीचा वेग आणखी मंदावला, ०.६९ टक्क्यांवरुन आता अर्ध्या टक्क्यावर
  •  महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास २४ पैकी एका विभागात म्हणजेच ‘एफ दक्षिण’ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा २९६ दिवस इतका आहे

मुंबई :  बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘कोविड – १९’ बाधित रुग्णांचे प्रमाण दुप्पट होण्याच्या सरासरी कालावधीने २१ ऑक्टोबर २०२० रोजी शतक गाठले. याच शृंखलेत आता महापालिका क्षेत्राने आणखी एक महत्त्वाचा टप्पा आज गाठला असून, नुकत्याच उपलब्ध झालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीने आज शतकपूर्ती केली आहे. याचाच अर्थ महापालिकेच्या सर्व २४ विभागातील गेल्या ७ दिवसांच्या आकडेवारीचे सांख्यिकीय विश्लेषण केले असता सर्व विभागांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता तब्बल १०० दिवस इतका झाला आहे. या अंतर्गत सर्वांधिक म्हणजे २९६ दिवस इतका कालावधी हा ‘एफ उत्तर’ विभागाचा आहे. या खालोखाल ४ विभागांमध्ये १७५ दिवसांपेक्षा अधिक कालावधी नोंदविण्यात आला असून ६ विभागांमध्ये १५० दिवसांपेक्षा अधिक कालावधी नोंदविण्यात आला आहे. तर ७ विभागांमध्ये १२५ किंवा त्यापेक्षा अधिक दिवस एवढा कालावधी आणि ६ विभागांमध्ये १०० ते १२४ दिवस एवढा कालावधी नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर रुग्णसंख्या वाढीमध्ये देखील लक्षणीय घट नोंदविण्यात आली असून, २१ ऑक्टोबर २०२० रोजी ०.६९ टक्के इतकी असणारी वाढ आता अर्ध्या टक्क्यावर (०.५०%)आली आहे.       

यानिमित्ताने महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी पुन्हा एकदा सर्व मुंबईकरांचे आभार मानत मा. लोकप्रतिनिधींच्या मार्गदर्शनामुळे आणि मुंबईकरांच्या सहकार्यामुळेच कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांना बळ मिळत असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'मिशन झिरो' हे आपले ध्येय असून ते गाठण्यासाठी मुंबईकरांचे सहकार्य महापालिकेला निश्चितपणे मिळेल, असा विश्वासही यानिमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा व्यक्त केला आहे.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा २५ ऑगस्ट २०२० रोजी ९३ दिवस इतका झाला होता. तथापि, त्यानंतर संसर्गाचे प्रमाण वाढल्याने हा कालावधी काही प्रमाणात कमी होत १४ सप्टेंबर २०२० रोजी ५४ दिवस इतका नोंदविण्यात आला होता. त्यानंतर बृहन्मुंबई महापालिकेने केलेली अधिक प्रभावी सर्वस्तरीय प्रतिबंधात्मक उपाययोजना, प्रभावीपणे राबविलेली 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम आणि सातत्याने साधलेली प्रभावी जनजागृती यामुळे या कालावधीत पुन्हा एकदा सकारात्मक वाढ नोंदविण्यात येऊन सर्व २४ विभागांचा रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी हा १ ऑक्टोबर रोजी ६६ दिवस, १० ऑक्टोबर रोजी ६९ दिवस, २१ ऑक्टोबर रोजी १०२ दिवस, तर आज १३९ दिवस एवढा नोंदविण्यात आला आहे. मात्र, आजच्या आकडेवारीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता महापालिकेच्या सर्व २४ विभागांपैकी सर्व विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा १०० दिवसांपेक्षा अधिक नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २९६ दिवस एवढा कालावधी हा ‘एफ दक्षिण’ विभागाचा असून सर्वात कमी म्हणजे १०५ दिवस एवढा कालावधी हा ‘आर उत्तर’ विभागाचा आहे.


 महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांचा स्वतंत्रपणे विचार केल्यास २४ पैकी एका विभागात म्हणजेच ‘एफ दक्षिण’ विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी हा २९६ दिवस इतका आहे. तर या व्यतिरिक्त ४ विभागांमध्ये सदर कालावधी १७५ दिवसांपेक्षा अधिक आहे. यामध्ये ‘ए’ , ‘जी दक्षिण’, ‘जी उत्तर’ व ‘बी’ या विभागांचा समावेश आहे. यानंतर ६ विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी हा १५० दिवसांपेक्षा अधिक असून यात ‘ई’, ‘एम पूर्व’, ‘एफ उत्तर’, ‘एन’, ‘के पूर्व’, ‘एच पूर्व’ या ६ विभागांचा समावेश आहे. या ११ विभागांव्यतिरिक्त उर्वरित १३ विभागांपैकी ७ विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १२५ ते १५० दिवस या दरम्यान; तर ६ विभागातील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीचे प्रमाण हे १०५ ते १२४ दिवस या दरम्यान आहे.   

वरीलनुसार रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीव्यतिरिक्त रुग्णसंख्येतील वाढीच्या टक्केवारीचे विश्लेषण केले असता देखील कोविड प्रतिबंधासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्वंकष व सर्वस्तरीय प्रयत्नांना यश येत असल्याचे अधोरेखित होत आहे.  यानुसार रुग्ण संख्येत होणा-या वाढीची सरासरी टक्केवारी ही दिवसेंदिवस कमी होत असून, गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी रोजी १.२२ टक्के असणारी ही टक्केवारी, २१ ऑक्टोबर २०२० रोजी ०.६९ टक्क्यांवर आली होती. या टक्केवारीत आज आणखी घट होत ती आता अर्ध्या टक्क्यावर म्हणजेच ०.५० टक्क्यावर आली आहे. एकीकडे रुग्ण दुपटीच्या कालावधीत सकारात्मक वाढ नोंदविली जात असतानाच, रुग्णवाढीच्या सरासरी टक्केवारीतही दररोज सकारात्मक घट नोंदविली जात आहे, ही देखील मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे.


बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढ होण्याच्या प्रती १०० रुग्णांमागील दर हा जेवढा कमी असेल तेवढे सकारात्मक व चांगले असल्याचे द्योतक आहे. दि. २१ ऑक्टोबर २०२० रोजी दिवस अखेरीस हा दर सरासरी ०.६९ टक्के एवढा होता. या दरात आता आणखी 'सकारात्मक घट' नोंदविण्यात आली असून हा दर आता सरासरी ०.५० टक्के एवढा झाला आहे. याच अनुषंगाने विभागस्तरीय आकडेवारीचा विचार केल्यास सर्वात कमी दर हा 'एफ दक्षिण' विभागामध्ये ०.२३ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. या खालोखाल 'ए' विभागात ०.३५ टक्के आणि 'जी दक्षिण' विभागात ०.३७ टक्के एवढा नोदविण्यात आला आहे. सर्व २४ विभागांपैकी १२ विभागांमधील सरासरी रुग्णवाढीचा एकूण सरासरी पेक्षा अर्थात ०.५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी