मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार स्थापन होऊन जवळजवळ एक महिन्याहून अधिकचा काळ लोटला आहे. मात्र तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होऊ शकलेला नाही. अशातच सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सरकारच्या वैधतेबाबत याचिकाही दाखल आहे. ज्यावर आजप्रमाणेच उद्या देखील सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार असा सवाल अनेक जण विचारत आहे. मात्र, आता याचबाबत एक मोठी घोषणा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांन केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा येत्या रविवारपर्यंतच होईल असं केसरकर यावेळी म्हणाले आहेत. पाहा मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले.
'कोर्टात सुनावणी आहे म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही यात कोणतंही तथ्य नाही. कालच मी जाहीर केलं आहे की, आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपआपसात चर्चा करतील आणि नेमकी ती तारीख आपल्याला कळेल. पण कोणत्याही बाबतीत यामध्ये चार दिवसापेक्षा अधिक वेळ होणार नाही याची खात्री आम्ही दिलेली आहे.' असं दीपक केसरकर यावेळी म्हणाले.
अधिक वाचा: maharashtra cabinet decisions : महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे १० महत्त्वाचे निर्णय
सूत्रांच्या माहितीनुसार, ५ तारखेलाच हा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा शिंदे गट आणि भाजपचा मानस आहे. ज्यामध्ये भाजपचे ८ आणि शिंदे गटाचे ७ आमदार हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दररोज नवनव्या तारखा दिल्या जात आहेत. असं असताना देखील अद्याप तरी हा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे येत्या रविवारपर्यंत तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक वाचा: राज्य सरकारचा निर्णय; शिंदेंचा नवा धक्का, मविआला बसला फटका
१६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर उद्याच सुनावणी
एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांच्या अपात्रेतबाबत शिवसेनेकडून ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज (३ ऑगस्ट) सुनावणी घेण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ही उद्या घेतील जाईल असं स्पष्ट केलं. उद्या प्राधान्याने या याचिकेची सुनावणी घेतली जाईल असंही कोर्टाने यावेळी सांगितलं. यामुळे उद्या या याचिकेबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कारण याच निकालावर शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.