Cabinet expansion will take place again before September 15 in Maharashtra : महाराष्ट्रात १५ सप्टेंबरच्या आधी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. 'प्रहार'चे आमदार बच्चू कडू यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधीमंडळाच्या आवारात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी ते जे म्हणाले त्यामुळे १५ सप्टेंबरच्या आधी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे.
पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली नसली तरी मी नाराज नाही लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर दोन-तीन आठवड्यांच्या आत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे आमदार बच्चू कडू म्हणाले. या वक्तव्यामुळेच दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे मुंबईत सुरू असलेले पावसाळी अधिवेशन २५ ऑगस्ट पर्यंत आहे. यानंतर दोन-तीन आठवड्यात म्हणजे १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी चर्चा आहे.
आमचे काही मुद्दे आहेत. त्यावर आमची लढाई सुरु राहील. १५ सप्टेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला आहे. माझ्या कामानिमित्त बाहेर असल्याने येऊ शकलो नाही. व्यक्तिगत हितासाठी नाराज होणार नाही; असे एका प्रश्नाचे उत्तर देताना आमदार बच्चू कडू म्हणाले.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये न्याय, अपंग कल्याण या खात्याचे मंत्रिपद आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे अशी जाहीर मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली होती. पण पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू यांचा समावेश झाला नाही. यानंतर बच्चू कडू काय करणार, ते नाराज आहेत का, अशा स्वरुपाच्या प्रश्नांवरून उलटसुलट चर्चा जोर धरू लागली. पण मी नाराज नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
पक्षनिष्ठेपेक्षा जनतेशी असलेली निष्ठा महत्त्वाची आहे. यामुळेच महाविकास आघाडीत असलेल्या ५० आमदारांनी ठामपणे एकनाथ शिंदे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. शिंदे फडणवीस सरकारला या आमदारांच भक्कम पाठिंबा असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि ३० जून २०२२ रोजी शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. यानंतर जवळपास दीड महिन्यांनी दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. या विस्तारात १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. रविवारी (१४ ऑगस्ट) खातेवाटपही जाहीर झाले. आता २० मंत्री कार्यरत आहेत. लवकरच राज्यात आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.