मध्य रेल्वेचे प्रवाशांना गारेगार ‘न्यू इयर गिफ्ट’, वेळापत्रकातही बदल

मुंबई
Updated Dec 12, 2019 | 19:44 IST | टाइम्स नाऊ मराठी

नवीन वर्षात मध्ये रेल्वेवर दाखल होणाऱ्या आणखी पाच लोकलचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. मध्य रेल्वेवर एकूण सहा वातानुकूलित लोकल दाखल होणार असून पहिली लोकल ही जानेवारी महिन्यात धावणार आहे.

मध्य रेल्वेचे प्रवाशांना गारेगार ‘न्यू इयर गिफ्ट’, वेळापत्रकातही बदल
Central railway gift of first ac local on central route  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • येत्या नवीन वर्षात मध्य रेल्वेर आणखी पाच नव्या लोकल दाखल होणार आहेत.
  • नवीन वर्षात मध्य रेल्वेवर दाखल होणाऱ्या आणखी पाच लोकलचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे.
  • परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी फेऱ्यांची भर पडली आहे.

मुंबई: येत्या नवीन वर्षात मध्य रेल्वेर आणखी पाच नव्या लोकल दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे यात तीन वातानुकूलित लोकलचाही समावेश आहे. मध्ये रेल्वेवर सध्या पहिली वातानुकूलित लोकल ही ठाणे ते वाशी, पनवेल या मार्गांवर धावणार आहे. तसेच नवीन वर्षात मध्य रेल्वेवर दाखल होणाऱ्या आणखी पाच लोकलचे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे. यामध्ये सीएसएमटी ते कल्याण या मार्गावर तीन वातानुकूलित लोकल चालवण्याचे नियोजन असून या लोकलच्या एकूण २७ फेऱ्या होणार आहेत. यासाठीचा प्रस्तावदेखील मध्य रेल्वे मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर एकूण सहा वातानुकूलित लोकल दाखल होणार असून पहिली लोकल ही जानेवारी महिन्यात ट्रान्स हार्बर म्हणजेच ठाणे ते वाशी या मार्गावर धावणार आहे. या लोकलच्या अप मार्गावर आठ आणि डाऊन मार्गावर आठ अशा एकूण १६ फेऱ्या दिवसाला होतील. यातील काही फेऱ्या या ऐन गर्दीच्या वेळेतही आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात आणखी एक लोकल मध्ये रेल्वेच्या ताफ्यात दाखल होईल. उरलेल्या चार लोकल डिसेंबरपर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत.

ट्रान्स हार्बरवरील वातानुकूलित लोकलचे वेळापत्रक तयार आहे. तसेच सीएसएमटी ते पनवेल हार्बर आणि सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गांचेही वेळापत्रक तयार आहे. हार्बरवरील एक लोकल चालवताना अप मार्गावर सात आणि डाऊन मार्गावर ६ फेऱ्या होणार आहेत. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर तीन वातानुकूलित लाकल चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या लोकलच्या २७ फेऱ्या होणार आहेत. यामध्ये डाऊन मार्गावर १५ आणि अप मार्गावर १२ फेऱ्या होणार असल्याची माहिती आहे. तसेच एक वातानुकूलित लोकल ही अतिरिक्त ठेवण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वेळापत्रक हे शनिवार म्हणजेच १४ डिसेंबरपासून बदलण्यात येणार आहे. सीएसएमटी ते खोपोली, कसारा या मुख्य मार्गावर १४ डिसेंबरपासून उपनगरी रेल्वेचे नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकलचे बिघडलेले वेळापत्रक सुधारण्यासाठी ४२ लोकलच्या वेळेत बदल करण्यात येणार आहेत. तसेच परळ स्थानकातून सुटणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये आणखी फेऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. या वेळापत्रकात अद्याप हार्बर आणि ट्रान्स हार्बर प्रवाशांसाठी कोणतीही घोषणा केलेली नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी