Central Railway shifting AC local trains to Main line from Harbour line : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण/टिटवाळा/अंबरनाथ दरम्यान बारा एसी लोकलच्या फेऱ्या शनिवार १४ मे २०२२ पासून वाढणार आहेत. हार्बर मार्गावर एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद नसल्यामुळे या मार्गावरील एसी लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. मध्य रेल्वे प्रशासन हार्बर मार्गावरील एसी लोकलच्या वेळांमध्ये आता सामान्य लोकल सेवा देणार आहे. यामुळे हार्बर मार्गावर सामान्य लोकलच्या संख्येत वाढ होईल.
कमी झालेले तिकिटांचे दर आणि वाढता उन्हाळा यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या प्रतिसादात वाढ झाली आहे. पण हार्बरवर एसी लोकलला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
तिकिटांचे नवे दर लागू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची दररोजची सरासरी प्रवासीसंख्या २८ हजार १४१ झाली आहे. या उलट हार्बरवर एसी लोकलची दररोजची सरासरी प्रवासीसंख्या ३ हजार २९९ आहे. हार्बरवरून प्रवास करणारे अनेक प्रवासी किमान दोन लोकलमधून प्रवास करतात आणि मुंबईत दाखल होतात. या प्रवाशांना एसी लोकलचे तिकीट काढणे व्यावहारिकदृष्ट्या फायद्याचे ठरत नाही. याच कारणामुळे हार्बरवर एसी लोकलला मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने मुख्य मार्गावरील एसी लोकलच्या संख्येत वाढ करण्याचा आणि हार्बर मार्गावरील एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
एसी लोकलच्या संदर्भात नवे निर्णय घेतल्यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील एसी लोकलची संख्या ४४ वरून ५६ होणार आहे. हार्बरवरील एसी लोकलच्या वेळांमध्ये सामान्य लोकल धावणार असल्यामुळे हार्बर मार्गावरील सामान्य लोकलच्या संख्येत वाढ होणार आहे. हा बदल झाला तरी मध्य रेल्वे कोणतीही नवी लोकल फेरी सुरू करत नसल्यामुळे लोकल फेऱ्यांची दैनंदिन संख्या १८१० एवढीच राहणार आहे.
हार्बरवरील एसी लोकलचा मासिक आणि त्रैमासिक पास काढलेल्यांना पासची मुदत संपेपपर्यंत सामान्य लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून अर्थात फर्स्ट क्लासमधून प्रवास करता येणार आहे. जितक्या दिवसांचा पास शिल्लक आहे, तितक्या दिवसांच्या वातानुकूलित आणि प्रथम श्रेणी भाडे फरकाचा परतावा रेल्वे स्थानकातील तिकीट खिडकीवरून मिळेल, असे मध्य रेल्वेने जाहीर केले.
एसी लोकलच्या तिकिटात ५० टक्क्यांची कपात झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. यामुळे पश्चिम रेल्वे एसी लोकल फेऱ्यांची संख्या दहाने वाढविण्याचे नियोजन करत आहे.
एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधील रोजची प्रवासी संख्या सरासरी २२ हजार होती. मे महिन्यात आतापर्यंत पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलमधील रोजची प्रवासी संख्या सरासरी ३२ हजार झाली आहे.
मुंबईतील इतर एसी वाहतुकीच्या पर्यायांच्या तुलनेत एसी लोकल ही पैसे आणि वेळ या दोन्हीची बचत करणारी सेवा आहे. यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ होत आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.