Weather Alert : पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह राज्यात पावसाची शक्यता; मुंबई, पुण्यात पावसाला सुरुवात

मुंबई
भरत जाधव
Updated Dec 01, 2021 | 10:23 IST

Weather Alert : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.  

Chance of rain in the state with thunderstorms for the next three days
पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह राज्यात पावसाची शक्यता  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळामुळे पाऊस पडत आहे.
  • येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार
  • पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather Alert :मुंबई : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांत आज मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) बुधवारी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.  दक्षिणपूर्व अरबी समुद्र,(Arabian Sea) मालदीव, लक्षद्वीपवर चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तेथून पूर्व-मध्य अरबी समुद्रात द्रोणीय स्थिती झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे पुढील तीन दिवस राज्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने मंगळवारी व्यक्त केली आहे.

यंदा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाची गेल्या दहा वर्षांत दुसऱ्यांदा नोंद झाली आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात सुमारे ३०.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. इतकेच नाहीतर २०१९मध्ये नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक १०९.३ मिमी पावसाची नोंद झाली असून इतर वर्षांत हा आकडा ५ मिमीपेक्षा कमी होता. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. इतकेच नाहीतर अवकाळी पावसाची ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. सध्या मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, या आठवड्यातही असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात मंगळवारी दिवसभरात कमाल तापमानात घट झाल्याची नोंद करण्यात आली असून कोणत्याही भागात पाऊस झालेला नाही. विविध ठिकाणी ढगाळ हवामान होते. राज्यात सर्वाधिक ३४.५ अंश सेल्सिअस तापमान रत्नागिरीत, तर सर्वात कमी १०.९ अंश सेल्सिअस तापमान गोंदियात नोंदवण्यात आले.

चक्रीवादळामुळे पाऊस

हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि मालदीव, लक्षद्वीपच्या परिसरात चक्रीवादळामुळे पाऊस पडत आहे. त्यामुळे पूर्व-मध्य अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अशा स्थितीत पुढील २४ तास महाराष्ट्रातील सागरी भागात पावसाची शक्यता आहे. कोकणातही पावसाची शक्यता आहे. दरम्यान दहा राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

हवामान खात्याने (IMD) गुजरातमध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जेथे 1 आणि 2 डिसेंबर रोजी पाऊस पडू शकतो. यासोबतच आज बुधवारपासून ते गुरुवारपर्यंत मुंबईत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  याशिवाय देशाची राजधानी दिल्लीत ५ आणि ६ डिसेंबरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  यादरम्यान पर्वतांवर पाऊस पडू शकतो आणि हिमवृष्टीचा इशाराही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस पडू शकतो.

मच्छिमारांना इशारा

पावसाच्या शक्यतेमुळे मच्छीमारांनी पुढील ५ दिवस महाराष्ट्र आणि गोव्याच्या समुद्रात मासेमारीला जाऊ नये, असा सल्लाही हवामान खात्याने दिला आहे. याशिवाय समुद्रात ताशी पाच ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. या कारणास्तव हा इशारा देण्यात आला आहे.  ’उत्तर महाराष्ट्रात वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ४५-५५ किलोमीटरवरून ताशी ६५ कि.मीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ’दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनाऱ्यावर वादळी हवामानासह वाऱ्याचा वेग ताशी ४०-५० कि.मी. प्रतितास जाण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी