Weather Update : मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिउष्णतेचा तडाखा सुरूच आहे. परंतु अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसही थांबण्याचं नाव घेत नाहीये.कोकणाला पावसानं झोडपलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये सकाळपासून पावसाने हजेरी लावली. दरम्यान राज्यात येत्या पाच दिवसांमध्ये तीव्र हवामान सक्रीय राहील, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य महाराष्ट्रामध्ये सोमवार म्हणजेच आजपासून उष्णतेच्या लाटेचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण कोकणच्या किनारपट्टीवर, अरबी समुद्रावर मध्यम प्रकारचे ढग होते. सकाळी मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भाग अंशतः ढगाळलेले होते. मात्र हे ढगांचे आच्छादन दूर झाल्यावर मुंबईमध्ये पुन्हा उष्णता जाणवू लागेल. आज सोमवारी मुंबईमध्ये काही प्रमाणात ढगाळलेले वातावरण जाणवेल, असा अंदाज आहे. यासोबतच येत्या पाच दिवसांत राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागांत गडगडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता आहे.
रायगड, पुणे जिल्ह्यामध्ये सोमवारी, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस, सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सोमवार ते गुरुवार, कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी तर बीड-परभणीमध्ये गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. या काळात वाऱ्यांचा वेगही अधिक असू शकेल. अकोला, बुलडाणा येथे मंगळवार ते गुरुवार तर यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये बुधवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा तडाखा जाणवू शकतो.
कोल्हापूर जिल्ह्यात मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजेचा कडकडाट पाऊस झाला. या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना रात्र जागून काढावी लागली.सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.
नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. बिलोली, देगलुर तालुक्यात सकाळी अवकाळी पाऊस बरसला. त्याआधी मध्यरात्री उशीराही काही तालुक्यांत अवकाळी पाऊस झाला.
पंढरपुरात सकाळीच अवकाळी पावसानं हजेरी लावली.. शहरात विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.
सोलापुरात सकाळी वादळी वा-यांसोबत झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं. द्राक्षबागांचं यात मोठं नुकसान झालं. यामुळे शेतक-यांवर पुन्हा एकदा आर्थिक संकट ओढवलं आहे.
जम्मू-काश्मीरसारख्या बर्फाच्छादित प्रदेशापासून ते संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशपर्यंत उष्णतेची लाट आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रातही उन्हाचा तडाखा बसत आहे. मध्य महाराष्ट्र ते विदर्भापर्यंत येत्या आठवड्यात उष्णतेची आणखी तापदायक लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.