भाजपने महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदी केली 'या' नेत्याची नियुक्ती

मुंबई
रोहित गोळे
Updated Feb 13, 2020 | 12:44 IST

BJP party state president: भाजपने राज्यातील प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष यांची निवड केली आहे. पाहा या महत्त्वाच्या पदी कोणत्या नेत्यांची वर्णी लागली आहे. 

chandrakant patil party state president and mangal prabhat lodha is appointed again mumbai bjp president 
भाजपने महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्षपदी केली 'या' नेत्याची नियुक्ती    |  फोटो सौजन्य: PTI

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप प्रदेशाध्यक्ष पद कोणाकडे सोपवणार यावर गेले अनेक दिवस चर्चा सुरु होती. याच चर्चेवर आता पडदा पडला आहे. कारण कोणतेही बदल न करता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रकांत पाटील यांनाच पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त केलं आहे. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर म्हणजेच जुलै महिन्यात चंद्रकांत पाटलांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने चंद्रकांत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार का? अशी चर्चा सुरु होती. मात्र, भाजपने पुन्हा एकदा चंद्रकांत पाटलांची निवड करुन त्यांच्यावरील विश्वास कायम ठेवला आहे. 

दुसरीकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा मंगल प्रभात लोढा यांचीच निवड केली आहे. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्र भाजपमध्ये कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. याबाबत भाजपने एक अधिकृत पत्रक काढून माहिती दिली आहे. मात्र, ही निवड किती काळापर्यंत असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

विधानसभा निवडणुकीआधी महाराष्ट्र भाजपत खांदेपालट झाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे केंद्रात राज्यमंत्री झाले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली होती. त्याचवेळी मुंबई भाजप अध्यक्षपदी मंगल प्रभात लोढा यांची वर्णी लागली होती. त्याआधी मुंबई भाजपची जबाबदारी ही आशिष शेलार यांच्याकडे होती. पण त्यांना राज्यातील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्यामुळे त्यावेळेस मुंबई भाजप अध्यक्षपद हे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे देण्यात आलं होतं. 

२०१४ साली राज्य मंत्रिमंडळात आल्यापासून चंद्रकांत पाटील यांचं पक्ष संघटनेत मोठं स्थान निर्माण झालं आहे. तसंच दिल्लीतील राजकीय वर्तुळात देखील त्यांचं वजन बरंच वाढलं आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा त्यांच्यावरच संघटनात्मक कामगिरी सोपवण्यात आली आहे. मात्र, आधीच्या कार्यकाळात त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत होता. मात्र, आता ते विरोधात आहेत. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत ठेवण्याचं आव्हान त्यांच्या समोर असणार आहे.  

गेल्या काही दिवसांपासून अशीच चर्चा होती की प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील हेच राहतील. अखेर त्यावर आज शिक्कमोर्तब झालं आहे. आगामी काळात राज्यातील अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका असणार आहेत. अशावेळी चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप कशी कामगिरी करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष असणार आहे. सध्या राज्यात भाजपला संयमी पण ठाम भूमिका घेणाऱ्या नेत्याची गरज आहे. या दोन्ही गोष्टी चंद्रकांत पाटील योग्यरित्या करु शकतात याची जाणीवही केंद्रीय नेतृत्त्वाला असल्यानेच चंद्रकांत पाटील यांची पुन्हा एकदा निवड झाल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी