Anant Chaturdashi 2019: गणपती विसर्जनासाठी मुंबईतील 'या' रस्त्यांवरील वाहतूक बंद

मुंबई
रोहित गोळे
Updated Sep 12, 2019 | 15:47 IST

गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी मुंबईतील अनेक रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर काही मार्ग बदलण्यात आले आहे. 

ganpati visarjan
गणपती विसर्जनासाठी मुंबईतील 'या' रस्त्यांवरील वाहतूक बंद  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मुंबईत गणपती विसर्जनासाठी जय्यत तयारी
  • वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी अनेक मार्ग बदलले
  • मुंबईतील अनेक मार्गांवर वाहतुकीला आज बंदी

मुंबई: गेले ११ दिवस अतिशय जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. पण आज भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देत आहे. मुंबईतील चौपाट्यांवर तर आज जनसागर लोटला आहे. एवढंच नव्हे तर मुंबईत तलाव, कृत्रिम तलाव येथेही मोठ्या प्रमाणात विसर्जन करण्यात येतं. पण यामुळे दुसरीकडे रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकांमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी अनेक मार्गांमध्ये बदल केले आहेत. 

विसर्जनासाठी मुंबई आणि परिसरात अलोट गर्दी उसळते. ज्याचा परिणाम वाहतूक मार्गावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वाहतूक मार्ग बंद करण्यात येतात तर काही मार्ग बदलण्यात येतात. काही ठिकाणी एकेरी वाहतूक मात्र सुरु ठेवण्यात येते. याशिवाय अनेक ठिकाणी आज रस्त्यांवर नो पार्किंग देखील आहे. मुंबईतील एकून ५३ रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

मुंबईत आज 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद:

डॉ. अॅनी बेझंट मार्ग, ना. म. जोशी मार्ग, एलबीएस मार्ग, कुर्ला पूर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, रानडे मार्ग, केळुसकर मार्ग, केळुसकर मार्ग दक्षिण, शिवाजी पार्क क्रमांक ३, शिवाजी पार्क क्रमांक 4,  केळुसकर मार्ग उत्तर, एन. सी. केळकर मार्ग, एम. बी. राऊत मार्ग, टिळक ब्रिज, चिंचपोकळी ब्रिज. याशिवाय अनेक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे जर आपण आज मुंबईत प्रवास करत असाल तर आपण ज्या ठिकाणी जाणार आहात तेथील वाहतुकीबाबत माहिती घेऊनच प्रवास सुरु करावा. 

दरम्यान, मुंबईतील अनेक चौपट्या, तलावात बाप्पांचं विसर्जन केलं जातं. त्यामुळे प्रशासनाने या सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. तसंच चौपट्यांवर मोठ्या प्रमाणात जीवरक्षक आणि मोटार बोट या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. जेणेकरुन काही घटना घडल्यास तात्काळ मदत पोहचवता येईल. 

विसर्जनादरम्यान कोणत्याही अप्रिय घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अनेक ठिकाणी बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय सीआरपीएफ, होमगार्ड, दंगल नियंत्रण पथक हे देखील तैनात असणार आहे. तसंच विसर्जनाच्या ठिकाणी काही एनजीओंची देखील मदत घेतली जाणार आहे. ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास बरीच मदत होईल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी