सिडकोच्या १५ हजार घरांचा यावर्षी ताबा नाही, विजेत्यांना आर्थिक भुर्दंड 

कोरोना संकटामुळे बहुतांशी व्यवहार मंदावले आहेत. सिडकोच्या नवी मुंबईतील महा गृहप्रकल्पालाही या महामारीचा फटका बसला आहे.

cidco 15 thousand lottery winner
सिडकोची १५ हजार विजेत्यांना आर्थिक भुर्दंड  

थोडं पण कामाचं

  • कोरोना संकटामुळे बहुतांशी व्यवहार मंदावले आहेत. सिडकोच्या नवी मुंबईतील महा गृहप्रकल्पालाही या महामारीचा फटका बसला आहे.
  • २ ऑक्टोबर २०१८ला लागलेल्या लॉटरीच्या नवीन घरांचा ताबा मुदतीत ऑक्‍टोबर २०२० मिळण्याची सूतराम शक्यता दिसत नाही.
  • मूळ कर्ज फेडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

cidco lottery, नवी मुंबई : कोरोना संकटामुळे बहुतांशी व्यवहार मंदावले आहेत. सिडकोच्या नवी मुंबईतील महा गृहप्रकल्पालाही या महामारीचा फटका बसला आहे.  २ ऑक्टोबर २०१८ला लागलेल्या लॉटरीच्या नवीन घरांचा ताबा मुदतीत ऑक्‍टोबर २०२० मिळण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. त्यामुळे सुमारे ११ हजार विजेत्यांचा या वर्षी ताबा मिळण्याचे स्वप्न भंगले आहे. दुसरीकडे बँकेकडून संपूर्ण कर्ज घेतल्यामुळे व्याजाची रक्कम भरली जात आहे. मूळ कर्ज फेडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्प या स्किमच्या यशानंतर सिडकोने तब्बल १४ हजार ८३८ घरांचा महागृहप्रकल्प राबवला आहे. भाजपच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कागदपत्रांच्या छाननीनंतर सिडकोने हप्ते भरण्याची मुदत दिल्यावर अनेक ग्राहकांनी हप्त्यात घरांची रक्कम भरली आहे. तसेच बँकेचे हप्ते सुरू झाले आहेत.  

घणसोली, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी या चार ठिकाणी या प्रकल्पांतील इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बहुतांश भूखंडांवर १४ माळ्यांचे उंच टॉवर उभे राहिले आहेत; मात्र इंटरेरिअर, विजेची कामे, अंतर्गत रस्ते, बगीचे, लिप्ट आदी महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्या मालमत्तांचा ताबा अद्याप इंजिनिअरिंग खात्याकडेच आहे. ही घरे मार्केटिंग विभागाकडे ट्रान्सफर झाल्याशिवाय त्याचा पझेशन देता येणार नाही. बांधकामेच अर्धवट अवस्थेत असल्यामुळे घरांचे पझेशन देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या नाहीत. 

यामुळे रखडली आहे कामे... 

२०१८ मध्ये सिडकोतर्फे महागृहप्रकल्पाची योजना जाहीर झाली. तेव्हा सिडकोतर्फे सर्व नियम, हप्ते आणि मुदतीबाबत माहिती देण्यासाठी एक माहिती पुस्तिका देण्यात आली होती. त्यानुसार ग्राहकांना पहिल्या टप्प्यात ११ हजार १७८ घरे ऑक्‍टोबर २०२० मध्ये, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार ७९६ घरे डिसेंबर २०२० आणि तिसऱ्या टप्प्यात ८६४ घरे मार्च २०२१ मध्ये ताबा देण्यात येणार होता, परंतु कोरोनामुळे या प्रकल्पांवर काम करणारे कामगार गावी गेल्याने कामे पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे मुदतीत घरे तयार न झाल्याने विजेत्यांना प्रत्यक्ष घराचा ताबा मिळण्यासाठी मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते. 

पूर्ण हप्ते भरणाऱ्यासाठी कसरत 

सिडकोच्या महा गृहप्रकल्पातील घरे खरेदी करणारे बहुतांश ग्राहक हे भाड्याच्या घरांमध्ये राहतात. त्यांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन हप्ते भरले आहेत. बॅंकांनी हप्ते दिल्यामुळे आता ग्राहकांना महिन्याचा हप्ता भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकीकडे पगारातून कपात होणारा बॅंकेचा हप्ता; तर दुसरीकडे घराचे भाडे भरायचे आहे. त्यातच कोरोनामुळे पगार कपात होत असल्याने बॅंकेचे हप्ते आणि घराचे भाडे भरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

रेराकडून सिडकोला मुदतवाढ 

कोरोनामुळे सिडकोच्या इमारती उभारण्याच्या कामाला जोरदार फटका बसला आहे. कंत्राटदार कंपन्यांचा कामगार गावी निघून गेल्यामुळे सहा महिने बांधकाम पूर्णपणे थांबले होते. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलेल्या मुदतीत घर देण्यास जमणार नसल्याने सिडकोने आधीच महारेराकडून घर ताब्यात देण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ करून घेतल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी