अटलांटिक महासागर पार करणारी पहिली मुंबईकर महिला पायलट

मुंबई
Updated May 15, 2019 | 13:15 IST | टाइम्स नाऊ मराठी वृत्तसेवा

मुंबईची आरोही पंडीतनं अटलांटिक महासागर पार करणार पहिली महिला पायलट ठरली आहे. या कामगिरीसह मुंबईकर आरोहीनं महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. 

Aarohi pandit
मुंबईकर मुलीचा सातासमुद्रापार झेंडा, अभिमानानं मान उंचावली  |  फोटो सौजन्य: Twitter

मुंबईः आताच्या काळात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे नाही आहेत. मुंबईकर असलेल्या पायलट आरोही पंडीत हिनं महिलांना प्रोत्साहन देणारं कार्य केलं आहे. मुंबईच्या आरोही पंडीतनं अटलांटिक महासागर एकटीनं पार करत सातासमुद्रापार भारताचा झेंडा फडकावला आहे. आरोहीनं कॅनाडाच्या नुनावुटमध्ये इकालुइट एअरपोर्टवर आपलं विमान लॅंड केलं. यावेळी आरोही ग्रीनलँडसह दोन ठिकाणी थांबली होती. 

मुंबईची २३ वर्षीय आरोही पंडीत या जगातली अशी पहिली महिला पायलट ठरली आहे. या पायलटनं हलक्या स्पोर्ट एअरक्राफ्टनं अटलांटिक महासागर पार केला आहे. आरोहीनं एका लहान एअरक्राफ्टनं  ३ हजार किलोमीटर अंतर पार केलं आहे. तसंच तिनं यासाठी सात महिने ट्रेनिंग घेतली होती. रनवे वर विमान थांबवल्यानंतर विमानातून खाली उतरल्यावर आरोहीनं पहिल्यांदा हातात भारताचा तिरंगा घेत आपल्या यशाचा आनंद साजरा केला. आरोहीनं बॉम्बे फ्लाइंग क्लबमधून फ्लाइंगची कठिण ट्रेनिंग घेतली होती. ट्रेनिंग घेतल्यानंतर आरोहीनं स्कॉटलॅंडच्या विक येथून कॅनाडाच्या इकालुइटपर्यंत उड्डाण केलं. या प्रवासादरम्यान तिनं आईसलॅंड आणि ग्रीनलँडचा दौरा देखील केला. 

या संपूर्ण प्रवासादरम्यान आरोहीनं पूर्ण अटलांटिक महासागर कव्हर केला. अभिमानाची गोष्ट म्हणजे, या प्रवासात आरोहीसोबत कोणीच नव्हतं. ती एकटी हा एअरक्राफ्ट चालवत होती. यासोबतच आरोही ग्रीनलँड आइसकॅपवर उड्डाण करणारी पहिली महिला सोलो फ्लाइट पायलट बनली आहे. 

तिनं ज्या एअरक्राफ्टमधून उड्डाण केलं त्याचं नाव माही आहे. ही एक छोटी सिंगल इंजिन साईनस 912 चं एअरक्राफ्ट आहे. या एअरक्राफ्टचं वजन एका बुलेट बाईकच्या वजनापेक्षा ही खूप कमी आहे. स्लोव्हेनिया या देशात या विमानाची निर्मिती करण्यात आली आहे. 

आरोही ही एक एलएसए परवानाधारक आहे. तिनं भारतातून उड्डाण केलं. ती पंजाब, राजस्थान, गुजरातहून पाकिस्तानात पोहोचली होती. त्यावेळी १९४७ नंतर एलएसए विमान उतरवणारी पहिली शेजारी देशातली नागरिक ठरली होती.  आरोहीनं हा एक विश्वविक्रम केला आहे. ती भारतात परत येईपर्यंत आणखी नवे विक्रम आपल्या नावावर करेल, असं  एसेसे  या सामाजिक संस्थेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. 

आपल्या विश्वविक्रमानंतर आरोहीनं आपली प्रतिक्रीया दिली आहे. मला खूप आनंदी आहे. आपल्या देशासाठी  काही तरी केल्यानंतर जगातली पहिली महिला पायलट होण्याचा जो काही मान मिळाला. त्याचा अभिमान वाटतो. अटलांटिक महासागर पार करण्याचा आनंद वेगळाच होता. महासागर पार करताना मी, एक लहान विमान, आकाश आणि खाली जमिनीवर असलेला निळसर समुद्र होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी