CM Eknath Shinde : "शिवछत्रपतींची शपथ तुम्हाला..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकरी बांधवांना भावनिक साद

Eknath Shinde Appeal to Farmers: राज्यात गेल्याकाही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानामुळे बळीराजावर मोठं संकट ओढावलं आहे.

CM Eknath Shinde appeale maharashtra farmers giving oath of Shiv Chhatrapati said farmer brothers do not commit suicide read full letter
"शिवछत्रपतींची शपथ तुम्हाला..." मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेतकरी बांधवांना भावनिक साद  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आसमानी संकट, सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल तर तो शेतकरी बांधवांचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde letter to farmers: राज्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (heavy rainfall) बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. या संकटात शेतकऱ्यांकडून टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे पाऊल बळीराजाने उचलू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र शेतकऱ्यांना लिहिले आहे. विधानसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शेतकरी बांधवांना पत्राद्वारे भावनिक साद घातली.

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना लिहिलेले पत्र जसेच्या तसे...

"माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो,

सर्वाना सप्रेम जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे. तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान या महाराष्ट्रातील शेतक-यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचंच नव्हे, तर उभ्या महाराष्ट्राची देशाची भूक भागवण्याचंही काम करताहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचा असेल, तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.

परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जातं, तुमच्यातलेच काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवत आत्मघाताचा मार्ग पत्करतात... हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषण्ण होऊन जातं...वाटतं, की आपल्याच घरातलं कुणी आपण गमावलंय......

लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे..... तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही. तुम्ही आमची संपत्ती आहात. माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्या-पाड्यातल्या शिवसैनिकांना नेहमी म्हणायचे, की रडायचं नाही, लढायचं....

शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हाला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका... आत्महत्या करू नका... मी तुमच्यासारखाच रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात. काळजाला भिडतात. या आसमानी संकटातून, या सावकारी दुष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं.....

मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा... जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना....

चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने

घडवूया !
जय महाराष्ट्र !"

अधिक वाचा : Maharashtra Ministers bungalow: राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना बंगल्याचे वाटप, पाहा कुठला बंगला कुणाच्या वाट्याला

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी