CM Eknath Shinde Phone: मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्यातील एका फोनची सध्या बरीच चर्चा रंगली आहे. याच फोनबाबत स्वत: मुख्यमंत्री शिंदे यांनी खुलासा केला आहे. आज (२१ जुलै) मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शिंदेंनी अंबादास दानवेंवर पलटवार केला आहे. तू काय आमदारांचा बॉस आहे का? असा सवाल विचारण्यासाठी मी दानवेंना फोन केला असल्याचं यावेळी शिंदे म्हणाले. (cm eknath shinde hits back to shiv sena leader ambadas danve phone call mla )
आगामी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव हे जल्लोषात साजरे करण्यात यावेत. कोरोनामुळे गेली दोन वर्ष हे सण साजरे करता आले नाही. त्यामुळे यंदा सण जल्लोषात साजरे करा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी केलं आहे. याचवेळी पत्रकाराने त्यांना अंबादास दानवेंना केलेल्या फोनबद्दल एक प्रश्न विचारला. त्यालाच मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे.
अधिक वाचा: ज्यांना 20 आमदारांचा पाठिंबा नाही त्यांना सीएम करणार?: साळवे
तू काय आमदारांचा बॉस आहे?, शिंदेंचा दानवेंना फोन
‘होय, मी अंबादास दानवेला फोन केला होता. पण आमच्यासोबत ये असं सांगायला नाही. आमच्यासोबत जे आमदार आले होते त्या आमदारांच्या पत्नीला आणि मुलांना अंबादास दानवे फोन करत होते. आमदारांना सांगा मला फोन करा म्हणून... यामुळे मी त्याला फोन केला. त्याला विचारलं की, 'तू काय आमदारांचा बॉस आहे का?', तुला काय अधिकार दिला आहे?.' असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
'मला एकनाथ शिंदेंनी फोन केलेला...'
अंबादास दानवे हे वैजापूरमध्ये शिवसैनिकांशी संवाद साधताना म्हणालेले की, 'मलाही एकनाथ शिंदेंचा फोन आला होता. ते मला म्हणाले, मी तुझ्यासाठी हे केलं, ते केलं… मग मी त्यांना उत्तर दिलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं, तुम्ही पक्ष म्हणून मदत केली, स्वतः व्यक्तिगत नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे होते म्हणून तुम्ही मदत केली. उपकार नाही केले. मी बाळासाहेब, उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे.' असं अंबादास दानवे म्हणाले होते. त्यामुळे आता नेमका कोणाचा संवाद खरा असा प्रश्न दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
अधिक वाचा: 'त्या' घटनेनंतर फडणवीसांचा सूर बदलला!
दरम्यान, एकीकडे एकनाथ शिंदे यांची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर उद्धव ठाकरेंना आपले शिवसैनिक टिकविण्याचं मोठं आव्हान पेलायचं आहे. त्यामुळेच आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे स्वत: मैदानात उतरले आहे. मात्र, शिवसेनेतच दोन गट पडले आहेत. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणाची अशी चर्चा अद्यापही सुरु आहे. या सगळ्याबाबत अनेक राजकीय पेचही निर्माण झाले आहेत. हे राजकीय पेच नेमके कसे सुटणार आणि शिवसेना नेमकी कोणाची हे कसं ठरणार याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा.