Night Curfew in Maharashtra: राज्यात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी लागू

मुंबई
सुनिल देसले
Updated Mar 26, 2021 | 21:09 IST

Night Curfew in Maharashtra: राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २८ मार्चपासून राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

Night Curfew
फाईल फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • महाराष्ट्रात २८ मार्चपासून रात्रीची जमावबंदी 
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश 
  • वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय

मुंबई : महाराष्ट्रात वाढता कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात रात्रीची जमावबंदी (Night Curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता २८ मार्च म्हणजेच रविवारपासून रात्रीची जमावबंदी लागू होणार आहे. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मॉल्स, रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील याची काळजी घ्यावी, गर्दी होमार नाही हे पहावे, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर घातलेली बंधने पाळावीत अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, संसर्गाला रोखण्यासाठी कडक उपाययोजना लागू करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने राज्यभरात रविवार, २८ मार्च २०२१ रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. 

लॉकडाऊन लावण्याची इच्छा नाहीये पण...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाहीये. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणआत राज्यभर उभारणी केली त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

धोका टळला नाही उलट वाढला

ब्रिटन सारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होताना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेनेही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशा वेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावताना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

... तर नाईलाजाने अधिक कडक निर्बंध लावावे लागतील

जनतेनेही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे असे आवाहन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, आपण बेड्स, आरोग्य सुविधा वाढवू परंतु डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी कसे वाढवणार, हे लक्षात घेतले पाहिजे. खासगी आस्थापनांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीसंदर्भात तसेच कार्यालयीन वेळेसंदर्भात बदल करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचनांचे आदेश निर्गमित केले आहेत. ते याचे पालन करत आहेत की नाही याची काटेकोरपणे पाहणी केली जावी तसेच मॉल्स, बार, हॉटेल्स, सिनेमागृहे अशा गर्दीच्या ठिकाणी त्यांना घालून दिलेल्या एस.ओ.पी. ची अंमलबजावणी होत नसल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. 

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा व राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी संवाद शाधत कोविड स्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर राज्य शासनाने राज्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

Mumbai News (मुंबई बातम्या), Times now ची मराठी वेबसाइट -Times Now Marathi वर। सोबत आणखी Marathi News (मराठी बातम्या) अपडेटसाठी आम्हांला गूगल न्यूजवर फॉलो करा. 

पुढची बातमी